पुढारी ऑनलाईन डेस्क :
जम्मू-काश्मीरमध्ये आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. कुलगाम येथे दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित शिक्षिकेवर अंदाधूंद गोळीबार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले.
काश्मिरी पंडित शिक्षिका रजनी या कुलगाममधील गोपालपोरा परिसरातील शाळेत शिक्षिका होत्या. त्या सांबा जिल्ह्यातील रहिवासी हाेत्या. आज सकाळी दहशतवादी शाळेत आले. त्यांनी रजनी यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या . मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली आहे.
या हल्ल्याचा माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी टिवट् केले आहे की, ही घटना अत्यंत दु:खद आहे. दहशतवादी हल्ल्यात निर्दोष नागरिकांचे बळी जात आहे. आता निषेध हा शब्दच बाेथट हाेत चालला आहे. सरकारकडून केवळ आश्वासन मिळत आहे. काेणतीही ठाेस कारवाई केली जात नाही.