सीमा भागासह महामार्गावर दारू तस्करांची दहशत !

दारू तस्कर
दारू तस्कर

कोल्हापूर, दिलीप भिसे: कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यांतील कुख्यात तस्करांनी सीमावर्ती भाग आणि पुणे-बंगळूर महामार्गावर अक्षरश: कब्जा केला आहे. गोवा बनावटीच्या विदेशी दारूसह ड्रग्ज तस्करीची दुकानदारीच थाटली आहे. चिरीमिरीला सोकावलेल्या घटकांना तसेच स्थानिक गुंड टोळ्यांच्या आश्रयाने तस्करांनी यंत्रणेसमोर आव्हान निर्माण केले आहे. दीड वर्षात दोन हजार 694 तस्करांना बेड्या ठोकून साडेआठ कोटीचा विदेशी दारूसाठा हस्तगत करूनही जिल्ह्यात आजही बिनभोबाट तस्करीचा फंडा चालू आहे. दारू, गुटख्यासह अमली पदार्थ तस्करांनी महामार्गावर अक्षरश: थैमान घातले आहे.

सीमाभागासह प्रमुख महामार्गावर होणार्‍या तस्करीची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी वर्षापूर्वी महाराष्ट्र, कर्नाटकचे राज्यपाल व उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीनंतरही तस्करीच्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाली आहे.

बैठका कागदावर… आदेश वार्‍यावर

2022 मध्ये गुन्ह्यांची संख्या एक हजार 935 होती. तत्पूर्वी 2021 मध्ये ही संख्या 1 हजार 689 होती. त्यात 246 गुन्ह्यांची भर पडली आहे. याचाच अर्थ उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या निर्णयास कोलदांडा देण्याचा प्रयत्न होत आहे.

तरुणांचा तस्करीकडे कल

पुणे-बंगळूर महामार्गावर गुटखा, अमली पदार्थ्याच्या तस्करीसह गोवा बनावटीच्या दारूची रात्रंदिवस रेलचेल आहे. तस्करीतून दररोज कोट्यवधीची उलाढाली करणार्‍या महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील नामचीन टोळ्यांनी कोल्हापूर, इचलकरंजी, शहापूर, जयसिंगपूर, सांगली, मिरजेसह दुष्काळी भागातील स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांना हाताशी धरून तस्करीची पाळेमुळे खोलवर रुजविली आहेत. विनासायास मिळणार्‍या कमाईमुळे 18 ते 30 वयोगटातील तरुण पोरंही तस्करीच्या उलाढालीत सक्रिय होऊ लागली आहेत. ओठावर मिसरुडही न फुटलेली पोरं व्यसनाची शिकार ठरू लागली आहेत.

जिल्ह्यात 2,980 गुन्हे

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह बिहारमधील कुख्यात दारू तस्कर व संघटित टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी संयुक्त पथकांची रात्रंदिवस करडी नजर असतानाही नामचीन टोळ्यांनी सुरक्षा यंत्रणा भेदून तस्करीचा फंडा चालूच ठेवला आहे. जानेवारी ते डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी ते 30 जून 2023 या दीड वर्षाच्या काळात कोल्हापूर येथील राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने 2694 तस्करांना बेड्या ठोकत 8 कोटी 63 लाख 11 हजार 691 किमतीचा दारूसाठा हस्तगत केला. दारू तस्करांविरुद्ध जिल्ह्यात 2 हजार 980 गुन्हे दाखल केले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news