राज्यात आपला खरा विरोधक काँग्रेस असल्याची 'बीआरएस'ला जाणीव आहे. दोनेक वर्षांपूर्वी तेलंगणामध्ये असलेली भाजपची हवा कमी झाली आहे. भाजप स्पर्धेतून बाहेर पडला, तर दुहेरी लढती होतील आणि सत्ताविरोधी लाटेचा फटका 'बीआरएस'ला बसू शकतो, असे मानणारा एक मोठा वर्ग आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीवेळी तसेच त्यानंतरच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूक वेळच्या चुका टाळण्याचा 'बीआरएस'चा आटोकाट प्रयत्न आहे. निवडणुकीच्या दोन महिने आधीच झालेली उमेदवारांची घोषणा हा त्याचा एक भाग आहे. 'बीआरएस'च्या उमेदवारांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवार घोषित होण्याआधीच 'बीआरएस'चे उमेदवार घराघरांपर्यंत पोहोचले आहेत, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचा विचार केला, तर बीआरएसने 90 आमदारांचे तिकीट कायम ठेवले आहे. उमेदवार बदलण्यात आल्याने जो धोका उद्भवतो, तो टाळण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे.