टेक इन्फो : ‘अ‍ॅपल’चा इशारा

टेक इन्फो : ‘अ‍ॅपल’चा इशारा
Published on
Updated on

सायबर गुन्हेगारी, हॅकिंगपासून ते डीपफेकपर्यंतच्या आधुनिक धोक्यांमुळे भारतासारख्या देशात आधीच चिंतेचे वातावरण आहे. यावर मात करणे सरकारसाठी मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत 'पेगासस', 'मर्सनेरी' यासारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हेरगिरी आणि घुसखोरीचे प्रकरण सिद्ध झाल्यास ती अधिक गंभीर बाब ठरेल…

एकविसाव्या शतकामध्ये मोबाईल ही अन्न, वस्त्र, निवारा यांच्याइतकीच जीवनावश्यक गरज बनल्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे. मात्र, या स्मार्टफोनच्या उपयुक्ततेपेक्षाही त्याच्या वापराचे धोके अधिक प्रमाणात समोर येत आहेत. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मोबाईलमुळे डोळ्यांवर, मेंदूवर, आकलनशक्तीवर कसा प्रतिकूल परिणाम होतो हे सांगत आहेत; तर बालमानसशास्त्रज्ञ आणि संगोपनाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ मुलांच्या भावविश्वावर कसा नकारात्मक परिणाम होत आहे आणि समाजव्यवस्थेत गैरप्रकार कसे वाढत आहेत याचे दाखले देत आहेत. बरं इतके सांगूनही अपरिहार्यता असल्याप्रमाणे मोबाईलचा वापर केला जात असताना त्याच्या माध्यमातून खासगी गोपनीय माहिती चोरली जात असल्याचे, त्यातील स्पायवेअर-मालवेअरद्वारे पाळत ठेवली जात असल्याचे समोर आले आहे.

जगातील सर्वात सुरक्षित मोबाईल फोन आणि कॉम्प्युटर बनवण्याचा दावा करणार्‍या 'अ‍ॅपल' या कंपनीने आपले उत्पादन वापरणार्‍यांना संदेश पाठवला आहे की, 'मर्सनेरी' स्पायवेअर हेरगिरी सॉफ्टवेअरद्वारे त्यांचे फोन हॅक केले जाऊ शकतात, त्यामुळे वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हा संदेश 'अ‍ॅपल'ने भारतासह 91 देशांतील त्यांच्या ग्राहकांना ई-मेलद्वारे पाठवला आहे. हे सॉफ्टवेअर वादग्रस्त ठरलेल्या 'पेगासस' स्पायवेअरप्रमाणे आहे. सहा महिन्यांपूर्वीही 'अ‍ॅपल'ने भारतातील काही लोकांना त्यांचे फोन 'पेगासस'चे लक्ष्य असू शकतात, असा इशारा दिला होता.

यातील बहुतांश विरोधी पक्षांचे नेते होते, त्यामुळे याबाबत बराच गदारोळ झाला होता; पण सरकारच्या दबावाखाली 'अ‍ॅपल'ने आपला इशारा मागे घेतला. तथापि, यावेळी कंपनीने आपल्या ग्राहकांना अत्यंत गांभीर्याने आणि आत्मविश्वासाने सावध केले आहे. भारतातील काही वापरकर्त्यांना 11 एप्रिलला रात्री 12.30 च्या सुमारास धोका सूचना (थ्रेट नोटिफिकेशन) पाठवली गेली. यामध्ये म्हटले होते की, आपला फोन 'भाडोत्री स्पायवेअर'द्वारे लक्ष्य केला जात आहे. मात्र, या हेरगिरी सॉफ्टवेअरद्वारे ज्यांचे फोन हॅक करण्यात आले त्यांची नावे त्यांनी उघड केलेली नाहीत. तथापि, जगभरात असे हल्ले होत असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. 'अ‍ॅपल' ही तंत्रज्ञानाच्या विश्वातील जगातील सर्वात आघाडीची कंपनी आहे. 2007 मध्ये पहिला आयफोन बाजारात आला. त्यानंतर आज दीड दशकानंतरची स्थिती पाहिल्यास जगभरात 1.46 अब्ज लोकांकडे 'अ‍ॅपल'चा फोन आहे. जगात वापरल्या जाणार्‍या स्मार्टफोन्समध्ये 'अ‍ॅपल'चा वाटा 21.67 टक्क्यांहून अधिक आहे.

अँड्रॉईड स्मार्टफोनपेक्षा अ‍ॅपल फोनच्या किमती काही पटींनी अधिक असतात. त्यामुळे आयफोन वापरणे हे भारतात स्टेटस सिम्बॉल ठरले आहे. अधिक प्रमाणात पैसे देण्यामागे प्रतिष्ठेखेरीज आणखी एक कारण म्हणजे या फोनची सुरक्षितता. अँड्रॉईड प्रणालीपेक्षा 'अ‍ॅपल'ची 'आयओएस' ही प्रणाली अधिक प्रगत, अद्ययावत आणि तुलनेने अधिक सुरक्षित मानली जाते. असे असूनही 'अ‍ॅपल'चे अत्यंत सुरक्षित मानले जाणारे फोन हॅक होत असतील, तर मग अँड्रॉईडवर चालणार्‍या इतर फोनच्या सुरक्षेची काय स्थिती असेल, याची कल्पनाच न केलेली बरी! 'अ‍ॅपल'चा संपूर्ण व्यवसाय आपल्या फोन आणि कॉम्प्युटरमध्ये कोणीही घुसखोरी करू शकत नाही, या विश्वासावर आधारित असल्याने त्याच्यासाठीही हे मोठे आव्हान बनले आहे. 'अ‍ॅपल'ने कबूल केले आहे की, ही घुसखोरी कोणत्याही सामान्य सायबर चोराच्या आवाक्यातली नाही. कारण, ज्या सॉफ्टवेअरद्वारे हा हल्ला केला जात आहे त्याची किंमत लाखो डॉलर आहे. 'अ‍ॅपल' या सॉफ्टवेअरवर मात करण्यासाठी काही व्यवस्था करू शकेल की नाही, हे येणारा काळच सांगेल; पण लोकांच्या गोपनीयतेमध्ये घुसखोरी केल्याबद्दल जगातील सर्व सरकारे आता पुन्हा निशाण्यावर येणार आहेत.

सुमारे तीन वर्षांपूर्वी जेव्हा भारतात 'पेगासस'चा वापर उघडकीस आला, तेव्हा बराच गदारोळ झाला होता. सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. हे सॉफ्टवेअर इस्रायली सरकारने विकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, याबाबत मखलाशी करताना इस्रायल सरकार म्हणते की, कोणत्याही स्वतंत्र व्यक्ती किंवा कंपनीला आम्ही ते विकत नाही; तर केवळ सरकारांनाच हे सॉफ्टवेअर दिले जाते. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले होते. सायबर गुन्हेगारी, हॅकिंगपासून ते डीपफेकपर्यंतच्या आधुनिक धोक्यांमुळे भारतासारख्या देशात आधीच चिंतेचे वातावरण आहे आणि यावर मात करणे सरकारसाठी मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत 'पेगासस', 'मर्सनेरी' यासारख्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हेरगिरी आणि घुसखोरीचे प्रकरण सिद्ध झाल्यास ती अधिक गंभीर बाब ठरेल.

वास्तविक, 'पेगासस' हे सॉफ्टवेअर खरे तर एक प्रकारचे गुप्तहेर आहे. हे सॉफ्टवेअर कोणाच्याही फोनमध्ये गुपचूप इन्स्टॉल केले जाऊ शकते आणि त्यानंतर त्या फोनचा कॅमेरा, माईक इत्यादींवर नियंत्रण मिळवून तो फोन संबंधित चोराला आपल्या पद्धतीने ऑपरेट करता येतो. सायबर सुरक्षा कंपनी 'कॅस्परस्की'च्या अहवालानुसार, 'पेगासस'च्या मदतीने एन्क्रिप्टेड ऑडिओ आणि एन्क्रिप्टेड संदेशदेखील वाचले जाऊ शकतात. एन्क्रिप्टेड केलेले संदेश असे असतात जे केवळ संदेश पाठवणार्‍या आणि प्राप्तकर्त्यालाच माहीत असतात. ज्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर मेसेज पाठवला जात आहे ती कंपनीदेखील पाहू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही; पण 'पेगासस' वापरून हॅकर त्या व्यक्तीच्या फोनशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतो. 2019 पर्यंत हे फोनमध्ये व्हॉटस्अ‍ॅप मिसकॉलद्वारेदेखील इन्स्टॉल करता येत होते. आयफोनमध्ये, आयमेसेज या 'बग'चा फायदा घेऊन ते इन्स्टॉल केले जायचे. आता तर कंपनीने अधिकृतरीत्या संदेश पाठवून इशारा दिल्यामुळे आयफोन वापरकर्त्यांच्या चिंता कमालीच्या वाढल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news