India Win Cape Town Test: केपटाऊन कसोटीत टीम इंडियाचा दिमाखदार विजय, द. आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव

India Win Cape Town Test: केपटाऊन कसोटीत टीम इंडियाचा दिमाखदार विजय, द. आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA 2nd Test : टीम इंडियाने 2024 वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे. रोहित सेनेने द. आफ्रिकेला केपटाऊन कसोटीत 7 विकेट्सने पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारतीय संघाच्या या विजयासह दोन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत सुटली आहे.

तत्पूर्वी, द. आफ्रिकेने दुसऱ्या डावात सर्व गडी गमावून 176 धावा केल्या. यजमान संघाकडून एडन मार्करामने शतकी खेळी (106) साकारली. यासह पहिल्या डावाच्या जोरावर 98 धावांनी पिछाडीवर असलेल्या प्रोटीज संघाने भारतासमोर विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात केली. दोघांमध्ये 34 चेंडूत 44 धावांची भागिदारी झाली असताना जैस्वालच्या रुपात भारताला पहिला झटका बसला. त्याला बर्गरने बाद केले. जैस्वालने सहा चौकारांच्या मदतीने 23 चेंडूत 28 धावा केल्या. यानंतर भारताला दुसरा धक्का शुभमन गिलच्या रूपाने बसला. तो 11 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. कागिसो रबाडाने त्याला क्लीन बोल्ड केले. विराट कोहली बाद होणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. तो 11 चेंडूत 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला मार्को जॅनसेनने यष्टिरक्षक काइल वेरेने करवी झेलबाद केले. यानंतर रोहित शर्मा (नाबाद 17) आणि श्रेयस अय्यर (नाबाद 4) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

पहिल्या डावात अवघ्या 55 धावांत गारद झालेल्या दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा डाव खेळणारा डीन एल्गर अवघ्या 12 धावा करून बाद झाला. त्यानंतरचे फलंदाज टोनी डी जोर्जी (1) आणि ट्रिस्टन स्टब्स (1) यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. यानंतर डेव्हिड बेडिंगहॅम अवघ्या 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दक्षिण आफ्रिकेने 66 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर एडन मार्करामने एक टोक धरून ठेवले. त्याने संयमी खेळी करत संघाची धावसंख्या 150 च्या पुढे नेली. तसेच भारतीय वेगवान गोलंदाजांचा धैर्याने सामना करत 99 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. भारताविरुद्धची ही त्याची पहिली शतकी खेळी ठरली. 103 चेंडूत 106 धावांची खेळी खेळल्यानंतर तो बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने 17 चौकार आणि 2 षटकार मारले. रबाडाच्या साथीने मार्करामने 8व्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. द. आफ्रिकेकडून या सामन्यातील ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. रबाडा 12 चेंडूत 2 धावा करून बाद झाला. (IND vs SA 2nd Test)

जसप्रीत बुमराह : 6 बळी

जसप्रीत बुमराहने द. आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात 6 बळी घेतले. आपल्या कसोटी कारकिर्दीत 9व्यांदा एका डावात किमान 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने 13.5 षटकांत 61 धावा दिल्या. या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 8 षटके टाकली, ज्यात त्याने 25 धावा देत 2 बळी घेतले. (IND vs SA 2nd Test)

भारतीय गोलंदाजांची कामगिरी

पहिल्या डावात 6 बळी घेणाऱ्या सिराजला दुसऱ्या डावात केवळ 1 बळी घेता आला. त्याने मार्करामची विकेट घेतली. मुकेश कुमारने 10 षटकात 56 धावा देत 2 बळी मिळवले. प्रसिद्ध कृष्णाला मर्यादित संधी मिळाल्या ज्यात तो आपला प्रभाव पाडू शकला नाही. दुसरी कसोटी खेळत असलेल्या कृष्णाने 4 षटकात 27 धावा देत 1 बळी घेतला. रवींद्र जडेजाने गोलंदाजी केली नाही.

केपटाऊन मैदानावर पहिला विजय

केपटाऊन कसोटी जिंकून भारताने इतिहास रचला. टीम इंडियाने या मैदानावर प्रथमच कसोटी सामना जिंकला आहे. केपटाऊनमध्ये भारताचा हा सातवा कसोटी सामना होता. यापूर्वी सहापैकी चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दोन कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका ड्रॉ करण्यात भारताला यश मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2010-11 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तीन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news