क्रिकेट : संघ निवडीचे वादंग

भारतीय क्रिकेट संघ
भारतीय क्रिकेट संघ
Published on
Updated on

चुकीचे निर्णय घेतले जाण्याची आता भारतीय क्रिकेट संघाची परंपराच झाली आहे. त्यामुळे सर्फराजला वेगवेगळी कारणे देऊन वगळण्याचे फारसे आश्चर्य वाटू नये. चुकीच्या संघ निवडीमुळेच 2013 च्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेपासून जेतेपदाचा दुष्काळ कायम राहत आला आहे.

अलीकडेच जाहीर झालेल्या भारतीय कसोटी संघातून सर्फराज खानला वगळले गेले आणि भारतीय क्रिकेटमध्ये आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले. महिनाभरही झाला नसेल; पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्येही अश्विनला संघातून बाहेर ठेवत आणखी एक वादग्रस्त निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला होता, त्याला यानिमित्ताने उजाळा मिळाला. आता यापूर्वी अश्विन होता आणि आता सर्फराज खान. फक्त चेहरे बदलले आहेत. वादाशी आपले नाते जुनेच आहे, हेच यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

26 वर्षीय सर्फराज खानच्या फिटनेसबद्दल अनेक तर्क-वितर्क आजवर लढवले गेले असले, तरी अगदी जागतिक स्तरावरदेखील सर्फराजची धावांची सरासरी सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर दुसर्‍या क्रमांकाची आहे, हे नाकारून चालत नाही. मागील तीन रणजी हंगामांत सर्फराजने जे सातत्य दाखवले ते निव्वळ लाजवाब आहे; पण यानंतरही त्याच्यासारख्या गुणवान खेळाडूला वगळले जाते, यातच सारे काही आले.

वास्तविक, सर्फराजचे प्रथमश्रेणी क्रिकेटमधील आजवरचे योगदान निव्वळ लक्षवेधी आहे. 37 सामन्यांत त्याची सरासरी 79 इतकी आहे, तर एका त्रिशतकासह त्याने 13 शानदार शतके झळकावली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, आजवर भारताच्या अगदी एकाही फलंदाजाला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 75 पेक्षा अधिक धावांची सरासरी राखता आलेली नाही. आता विरोधाभास पाहा, सर्फराजकडे दुर्लक्ष करून ज्या ऋतुराज गायकवाडला संघात मानाचे स्थान मिळाले, त्याची भारतीय क्रिकेटमधील प्रथमश्रेणी सरासरी केवळ 42 च्या घरातील आहे.

बीसीसीआय याबाबत काय म्हणते, हेदेखील उल्लेखनीय आहे. तंदुरुस्तीचा अभाव व मैदानाबाहेरील आक्षेपार्ह वर्तणुकीमुळे सर्फराजचा निवडीसाठी विचार झाला नाही, असे मंडळातील एका सदस्याने गोपनीयतेच्या अटीवर वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते. सर्फराजच्या गुणवत्तेबद्दल साशंकता घेण्याचे कारणच नाही. कारण, जो खेळाडू रणजीमध्ये सातत्याने शतके झळकावू शकतो, 75 पेक्षा अधिक धावांची सरासरी राखू शकतो, त्याचा कसोटी संघात निश्चितपणाने विचार व्हायला हवा; पण तरीही दोन बाबी सर्फराजच्या विरोधात आहेत. त्यातील पहिली बाब म्हणजे, सर्फराजला आजही जलद गोलंदाजीला सफाईने सामोरे जाता येत नाही आणि दुसरी बाब म्हणजे, भारत अ संघातर्फे अनधिकृत लढतीत संधी मिळाली, त्यावेळी तो धावा जमवू शकला नव्हता. त्याच्या अन्य प्रतिस्पर्ध्यांनी मात्र याबाबतीत आपले नाणे अगदी खणखणीत वाजवून दाखवले आहे.

सर्फराजला वगळले जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे, त्याने चौथ्या-पाचव्या स्थानीच अधिक धावा केल्या आहेत आणि व्यवस्थापनाला गरज आहे ती पहिल्या तीनमध्ये येऊन खोर्‍याने धावा ओढू शकणार्‍या युवा फलंदाजाची! सर्फराज या निकषावरदेखील मंडळाच्या पॉलिसीत बसत नाही. मागील 16 वर्षांचा इतिहास पाहिला, तर एक बाब प्रकर्षाने लक्षात येईल की, प्रथमश्रेणी स्तरावर तळाच्या क्रमांकावरचा अगदी एकही खेळाडू फक्त फलंदाजीच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही.

अगदी अंबाती रायुडू व मनीष पांडे यांची उदाहरणे समजावून घेतली, तरी हेच अधोरेखित होते की, सर्फराजने फलंदाजी क्रम बदलत पहिल्या तीनमध्ये फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले; तरच संघात एंट्री सोपी होऊ शकते. कोणत्याही संघातील पहिले चार फलंदाज नव्या चेंडूवर फटकेबाजी करण्यात निष्णात तज्ज्ञ असावे लागतात; पण सर्फराज आता चौथ्या-पाचव्या क्रमांकावर येतो, त्यावेळी चेंडूची चकाकी निघून गेलेली असते आणि अशा चेंडूवर तुलनेने कमकुवत गोलंदाजांविरुद्ध फटकेबाजी करण्याचा सर्फराजचा अनुभव भारतीय संघासाठी फारसा उपयुक्त नाही, हेच या निवडीतील निर्णयाने अधोरेखित होते आहे. आता कमी वय ही सर्फराजची जमेची बाजू आहे. अवघ्या 26 वर्षांचा असल्याने त्याला बरीच संधी असेल; पण फलंदाजीत काही लवचिक बदल त्याला करावेच लागतील, हा यामागील अलिखित संदेश आहे.

दुसरी बाजू अशी की, सर्फराजला वगळून जे तारे तोडले गेले, त्याची ही काही पहिली वेळ अजिबात नाहीय. यापूर्वीही, कोणत्याच निकषात न बसणारे, अनाकलनीय असे अनेक निर्णय घेतले गेले आहेत आणि त्याची फळेही संघाला निश्चितपणाने भोगावी लागलेली आहेत.

2016 टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत युवराज सिंगऐवजी अजिंक्य रहाणेला निवडले गेले, 2019 विश्वचषक स्पर्धेसाठी अंबाती रायुडूकडे दुर्लक्ष केले गेले, 2021 जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये ढगाळ हवामान असतानाही अश्विनला संधी देण्यात आली, 2021 टी-20 वर्ल्डकपसाठी युजवेंद्र चहलऐवजी राहुल चहर, वरुण चक्रवर्ती यांची निवड, असे अनेक अनाकलनीय निर्णय यापूर्वी घेण्यात आले आहेत.

2016 टी-20 विश्वचषक स्पर्धेचे उदाहरण अगदी डोळ्यांत अंजन घालणारे आहे. युवराजने त्या स्पर्धेतील उपांत्य लढतीपूर्वी 4 सामने खेळले होते आणि त्यात 100 चा स्ट्राईक रेट नोंदवला होता; पण अंतिम क्षणी त्याच्याऐवजी रहाणेला संघात घेण्यात आले. रहाणेने त्यावेळी स्पर्धेत एकही सामना खेळलेला नव्हता. निर्णायक टप्प्यावर दडपण झेलताना त्याला सावध पवित्र्यावर भर द्यावा लागेल, हे निश्चित होते. त्याला 40 चेंडूंत 35 धावांवर समाधान मानावे लागले आणि भारताला याचा फटका सोसावा लागणारच होता.

2019 आयसीसी विश्वचषक स्पर्धेपूर्वी अंबाती रायुडूने चौथ्या स्थानी धावांची भरघोस लयलूट केली होती; पण विश्वचषक संघात विजय शंकर पहिल्या पसंतीचा पर्याय असेल, असे जाहीर केले गेले. याचा फटका असा बसला की, चौथ्या स्थानी कोण, याचे उत्तर संघाला स्पर्धा संपेपर्यंत देता आले नाही! विजय शंकर ते रायुडू असे प्रयोग सुरूच राहिले.

2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवड करतानाही आश्चर्याने भुवया उंचवाव्या लागतील, अशा निवडी केल्या गेल्या. कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार के. एल. राहुल हे स्वत:च फारसे लक्षवेधी योगदान देण्यात अपयशी ठरले आणि भारताची पॉवर प्लेमधील सरासरी अपेक्षेपेक्षाही कमी राहिली. अगदी शेवटच्या मिनिटाला जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद शमीला संघात घेण्याचा निर्णय त्यापेक्षा अधिक धक्का देणारा ठरला. आश्चर्य म्हणजे, शमीने त्या निवडीपूर्वी तब्बल वर्षभरात एकही टी-20 सामना खेळला नव्हता. हर्षल पटेलला संधी मिळाली; पण त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये एकदाही खेळवले गेले नाही.

दीपक हुडा हा आघाडीचा फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरवला गेला, तर तीन डावखुरे फलंदाज घेऊन खेळणार्‍या इंग्लंडविरुद्ध उपांत्य लढतीत भारताने चक्क अक्षर पटेलला संघातून बाहेर ठेवले होते. दिनेश कार्तिकची पाठराखण करण्याचाही निर्णय असाच धक्कादायक स्वरूपाचा होता. कार्तिक फिनिशर म्हणून लक्षवेधी योगदान देईल, अशा शब्दांत त्या निर्णयाचे समर्थन करणार्‍या व्यवस्थापनाने याच कार्तिकला केवळ तीन सामन्यांनंतरच बाहेरचा रस्ता दाखवला, असे इतिहास सांगतो.

थोडक्यात, चुकीचे निर्णय घेतले जाण्याची ही पहिली वेळ अजिबात नाही. किंबहुना, ती आता आपली परंपराच झाली आहे आणि याचमुळे सर्फराजला वेगवेगळी कारणे देऊन वगळण्याचे फारसे आश्चर्य वाटावे, अशी परिस्थिती नाही.

आता अशा निर्णयांचे एकंदरीत पडसाद कसे उमटतात, तेही पाहुया. कदाचित चुकीच्या संघ निवडीचाच परिणाम असेल, 2013 चॅम्पियन्स चषक स्पर्धेपासून चालत आलेला जेतेपदाचा दुष्काळ आतापर्यंत कायम राहत आला आहे. कधी अंतिम फेरीत, कधी उपांत्य फेरीत, तर कधी साखळी फेरीतच संघाला गाशा गुंडाळावा लागतो आणि क्रिकेट रसिकांचे डोळे नेहमीप्रमाणे पुढील आयसीसी ट्रॉफीच्या तारखांकडे लागतात. पुढील स्पर्धा येते; पण, कुठे ना कुठे माशी शिंकते, संघ अचानक कुठे तरी गाशा गुंडाळतो आणि चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा होते.

ही परिस्थिती टाळायची असेल, तर संघातील विविध घटकांनी केव्हा तरी सवडीने 1983 चा विश्वचषक जिंकणार्‍या कपिलदेवच्या आणि 2007, 2011 मध्ये दुहेरी विश्वचषक जिंकून देणार्‍या धोनीच्या कारकिर्दीची उजळणी करावी आणि डोळ्यांवरील आयपीएलचा चष्मा काढून यापुढील निवडी कराव्यात. असे झाले तरच भारतीय क्रिकेटच्या मानगुटीवर बसलेले अपयशाचे भूत झटकून टाकता येईल. अगदी
यातील 30-40 टक्के बदल केले, तरी भारतीय क्रीडा वर्तुळ त्यांचे शतश: ऋणी राहील, याबद्दल तूर्तास तरी साशंकता नको!

विवेक कुलकर्णी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news