मुंबई, वृत्तसंस्था : BCCI Central Contract : भारत विरुद्ध इंग्लंड ही टेस्ट मालिका नुकतीच संपन्न झाली. या कसोटी मालिकेत एकाच सामन्यातून पदार्पण करणार्या सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना बीसीसीआयने एक अप्रतिम भेट दिली आहे. या दोन्ही क्रिकेटपटूंना केंद्रीय कराराच्या क गटात स्थान मिळाले आहे. पण त्याचबरोबर इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे मात्र साफ दुर्लक्ष करताना बीसीसीआयने आपला करारीपणा दाखवून दिला आहे.
भारताचा नवा फलंदाज सर्फराज खान आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यांचा समावेश बीसीसीआय (भारतीय क्रिकेट बोर्ड) च्या केंद्रीय कराराच्या सी गटात एक कोटी रुपयांच्या वार्षिक रिटेनरशिप फीसाठी करण्यात आला आहे. या दोघांनी संस्थेच्या नियमांची पूर्तता केली आहे. सोमवारी झालेल्या बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत या दोघांच्या नावांना मंजुरी देण्यात आली. (BCCI Central Contract)
पुढील हंगामासाठी बीसीसीआय रणजी ट्रॉफीच्या कॅलेंडरमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात उत्तर भारतात कोणतेही सामने आयोजित होणार नाहीत. कारण धुके, प्रकाशाची कमतरता अशा अनेक समस्यांचा सामना खेळाडूंना करावा लागतो. संपूर्ण देशांतर्गत कॅलेंडर नंतर जाहीर केले जाईल. परंतु बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने 2024-25 च्या तात्पुरत्या वेळापत्रकावर चर्चा केली या बैठकीचा हा प्रमुख अजेंडा होता. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु रणजी करंडक ऑक्टोबरच्या मध्यात किंवा शेवटच्या वर्षांप्रमाणे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर सुरू होऊ शकतो. काही ठरावीक राज्यांमध्ये खराब हवामानामुळे संघाला आवश्यक सामने गमवावे लागतात.