Team India Revenge vs New zealand : धोनी का, कोहली का, गांगुली का… सबका बदला लेगा यह रोहित

Team India Revenge vs New zealand : धोनी का, कोहली का, गांगुली का… सबका बदला लेगा यह रोहित
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Revenge vs New zealand : न्यूझीलंडने बंगळूर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव करत विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीसाठी आपला दावा मजबूत केला. त्यातच शनिवारी पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धचा सामना गमावला आणि उपांत्य फेरीतून त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे आता भारतासोबत किवी संघाचा सामना निश्चित झाला आहे.

चार वर्षांपूर्वीचे पराभवाचे दुखणे

चार वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पत्करावा लागलेल्या पराभवाचे दुखणे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये अजूनही ताजे आहे. 2019 मध्ये अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्नभंग झाल्यानंतर धोनीसह संपूर्ण संघाच्या डोळ्यात पाणी आले होते. आता 2023 मध्ये भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. चार वर्षांनंतर भारत आणि न्यूझीलंड पुन्हा एकदा उपांत्य फेरीत आमनेसामने येणार आहेत. हा सामना 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यामुळे चार वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारताला मोठी संधी मिळाली आहे. (Team India Revenge vs New zealand)

बदला घेण्यासाठी रोहित सेना सज्ज

2019 मध्ये भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 239 धावांवर रोखले. पण प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण संघ 49.3 षटकांत 221 धावांत ऑलआऊट झाला. त्या सामन्यात, एमएस धोनी शेवटच्या षटकात धावबाद झाला, ज्यामुळे भारताच्या आशांना मोठा धक्का बसला होता. आता 4 वर्षांनंतर न्यूझीलंडचा बदला घेण्यासाठी रोहित सेना सज्ज झाली असून बुधवारी होणा-या या सामन्याकडे सर्व क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

भारतीय संघ मजबूत (Team India Revenge vs New zealand)

गेल्या विश्वचषकापेक्षा यावेळी भारतीय संघ अधिक मजबूत दिसत आहे. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी पूर्ण फॉर्ममध्ये आहे. कर्णधार रोहित, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे फलंदाजीत दमदार कामगिरी करत आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजाही बॉल आणि बॅटने लयीत आहे. वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांच्यासमोर सर्व फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. फिरकी विभागात कुलदीप यादव जडेजाला उत्तम साथ देत आहे. अशा स्थितीत न्यूझीलंडला यावेळी अत्यंत सावध राहावे लागणार आहे.

हेन्री विश्वचषकातून बाहेर

न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू हेन्री दुखापतीमुळे या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. या विश्वचषकात त्याने 7 सामन्यात 11 विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत टीम इंडियाची एक समस्या टळली आहे. हेन्रीने 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्मा आणि केएल राहुलला 1-1 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.

'सँटनर-बोल्ट'पासून सावधान (Team India Revenge vs New zealand)

मात्र दुसरीकडे ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनर हे संघाचा भाग असून ते टीम इंडियाला धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. मिचेल सँटनरच्या बाबतीत टीम इंडियाला सावध राहावे लागणार आहे, कारण त्याने या विश्वचषकात आतापर्यंत टीच्चून मारा केला आहे. सँटनरने 9 सामने खेळले असून त्यात त्याने 16 विकेट घेतल्या आहेत. 2019 मध्ये सँटनरने हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांना आपल्या फिरकीचा बळी बनवले होते.

आयसीसी नॉकआऊटमध्ये चौथ्यांदा आमनेसामने

आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत भारत आणि न्यूझीलंड चौथ्यांदा भिडणार आहेत. याआधी दोन्ही संघ वेगवेगळ्या टूर्नामेंटच्या बाद फेरीत तीनदा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान, प्रत्येक वेळी न्यूझीलंडचा संघ बाजी मारण्यात यशस्वी ठरला आहे. 2019 विश्वचषक व्यतिरिक्त, 2000 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये किवींची भारतावर मात केली होती. (Team India Revenge vs New zealand)

वनडेमध्ये खडतर स्पर्धा

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. वनडेमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 109 सामने झाले आहेत. न्यूझीलंडने 50 आणि भारताने 59 जिंकले आहेत. 7 सामन्यांचे निकाल लागलेले नाहीत, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.

घरच्या मैदानावर भारताचा वरचष्मा

विश्वचषक आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा असते, पण टीम इंडियाने घरच्या मैदानावर वरचष्मा गाजवला आहे. भारतीय मैदानांवर दोन्ही संघांमध्ये 39 सामने झाले असून त्यातील टीम इंडियाने 30 तर न्यूझीलंडने 8 जिंकले आहेत. फक्त एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. 1987 च्या विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रुप स्टेजचे 2 सामने खेळले गेले. भारताने बंगळूरमध्ये 16 धावांनी आणि नागपूरमध्ये 9 गडी राखून विजय मिळवला. आता यावेळी धरमशाला येथे झालेल्या सामन्यात भारताने 4 गडी राखून सामना जिंकला. याचाच अर्थ मायदेशातील द्विपक्षीय मालिका आणि विश्वचषक या दोन्हींमध्ये टीम इंडियाचा दबदबा राहिला आहे.

ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया न्यूझीलंडवर भारी

ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळला गेला, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि टीमने 48 षटकात 6 गडी गमावून 274 धावांचे लक्ष्य गाठले. हा सामना धर्मशाला येथे झाला. आता 15 नोव्हेंबरला भाऊबीज दिवशी उपांत्य उभय संघांदरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. हे रोहितचे होम ग्राउंड आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news