शिक्षक दिन विशेष : शिक्षकांप्रती आदरभावाचं मर्म

शिक्षक दिन विशेष : शिक्षकांप्रती आदरभावाचं मर्म

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती भारतात शिक्षक दिन म्हणून साजरी होते. आयुष्याला वळण देणार्‍या, मार्गदर्शन करणार्‍या, जीवनमूल्यांची-नव्या जगाची ओळख करून देणार्‍या शिक्षकांविषयीचा कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठीचे निमित्त म्हणजे हा दिवस. पण शिक्षकांचे, गुरूंचे आयुष्यातील योगदान पाहता ही कृतज्ञता एका दिवसापुरती मर्यादित असता कामा नये.

दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. दिवंगत राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आज गेली कित्येक दशके हा दिवस साजरा जातो. शिक्षक दिनासाठी तयारी विद्यार्थी बरेच दिवस आधीपासून करतात. या दिवशी सकाळपासून मुलांची खूप धावपळ होते. आपल्या गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्याची त्यांना खूप घाई असते. कोणत्या शिक्षकाला काय द्यायचं, यासाठी ते आपल्या आई-वडिलांना कामाला लावतात, हट्ट करतात. ती एक वेगळीच आनंदाची पर्वणी असते. या अतिउत्साहात बर्‍याच गोष्टी होतात. मात्र बरेच वेळा मूळ मुद्दा बाजूला पडतो आणि त्याचे स्वरूप बदलते. म्हणूनच म्हणावेसे वाटतं की, शिक्षक दिन एका दिवसाचा नसावा.

एवढ्यातच एक सुंदर पोस्ट वाचायला मिळाली. जपानमधली घटना आहे. आपल्या भारतीय शिक्षकाने जपानमध्ये असताना तेथील शिक्षक दिनाविषयी आपल्या सहशिक्षकाला विचारले की जपानमध्ये शिक्षक दिन कसा साजरा करतात? त्यावेळी जपानी शिक्षकाने दिलेले उत्तर मोठे विचार करण्यासारखे होते. तो म्हणाला की, जपानमध्ये शिक्षक दिन साजरा केला जात नाही. त्याच्या या उत्तराने भारतीय शिक्षक जरा विचारात पडला, हे कसं शक्य आहे? काही दिवसांनी जपानी शिक्षकाने भारतीय शिक्षकाला स्वतःच्या घरी आमंत्रित केले. काम संपल्यावर दोघेही त्याच्या घरी जाण्यासाठी निघाले. संध्याकाळची वेळ होती. मेट्रोला अतिशय गर्दी होती. बरीच यातायात करून हे दोघे कसेबसे आत शिरले. मुंगीला सुद्धा शिरायला जागा नव्हती. अशा परिस्थितीत एक वयस्कर गृहस्थ अर्थात जपानी त्यांनी आपल्याजवळील जागा भारतीय शिक्षकाला देऊ केली. वारंवार विनंती केल्यावर आपले शिक्षक महोदय जाऊन बसले. खाली उतरल्यावर त्यांनी आपल्या सहशिक्षकाला म्हणजे जपानी शिक्षकाला विचारले, हे असे का? एवढ्या गर्दीत त्यांनी मला जागा का बरं करून दिली! जपानी शिक्षक फक्त हसला आणि माझ्या कोटावर लावलेल्या शिक्षकाच्या नेमटॅगकडे हात दाखवू लागला. मला समजेनासे झाले. असं का? यावर त्याने उत्तर दिले की, जपानमध्ये शिक्षकी पेशा आणि शिक्षक याबद्दल खूप आदर आहे.

कोणाच्याही घरी आपण जातो, तेव्हा रिकाम्या हाताने जात नाही. काहीतरी भेटवस्तू, किंवा मिठाई घेऊन जातो ही आमची आचार पद्धती आहे, असे आपल्या शिक्षक महोदयांनी सांगितल्यावर तो सहशिक्षक म्हणाला, आमच्याकडे शिक्षकांसाठी वेगळे दुकान आहे. तिथे त्यांना भरपूर सवलत दिली जाते. आपण तेथूनच काही खरेदी करुया. मला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला, अशी प्रतिक्रिया आपल्या शिक्षकांनी दिली. जपान देश तसाही, शांतताप्रिय आणि सौजन्यशील आहे. शिक्षकांना दिला जाणारा आदर, कृतज्ञता ही कायमस्वरूपी आणि वर्षभर चालणारी मानणारी परंपरा जपानमध्ये मोठ्या निष्ठेने जपली जाते. यासाठी त्यांना वेगळा शिक्षक दिन साजरा करण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यांची ही परंपरा अनुसरणीय आहे. पाश्चात्त्यांचे अनुकरण करणारी, आपली मंडळी अशा प्रकारचे अनुकरण का करीत नाहीत, असा प्रश्न पडतो.

आपण शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. शाळा, कॉलेज सजवले जाते. बाजारपेठही देखील शिक्षकांसाठी भेटवस्तूंनी सजलेली असते. लहान वर्गात टीचर म्हणजे खरोखरच गुरु, आई अशीच असते. काही शिक्षकांनी आपल्या आयुष्यातील फार सुंदर प्रसंग सांगितलेले आहेत. एक जण म्हणाल्या, मी तिसरीच्या वर्गावर शिकवीत असतानां शिक्षक दिनाच्या दिवशी एका मुलाने मला एक अनोळखी भेट वस्तू दिली. ्एका वहीच्या पानावर छोटी छोटी हृदये काढून मध्यभागी हृदयाचे मोठे चित्र काढले आणि त्यात माझे नाव लिहिले. बाजूला एक कावळ्याचे पीस लावले. खाली लिहिले होते, माझ्या आवडत्या टीचरसाठी. त्या ठिकाणी माझे नाव होते. क्षणभर मी विस्मित झाले. पण त्या मागील भावना खूपच भावली, कारण ते पीस त्याने मला आपल्या संग्रहातून दिलेले होते. शिक्षकांविषयी श्रद्धा मुलांच्या मनात असतेच, मात्र ती तशीच कायम राहावी यासाठी शिक्षकांनीही मर्यादा सांभाळली पाहिजे. तरच मुलं तुमच्याशी कायम बांधून राहतात.

ही भावना एका दिवसाची नाही, ती कायमस्वरूपी आहे. हीच बाब त्या जपानी शिक्षकाने आपल्या भारतीय शिक्षकाला बोलून, माहिती देऊन नाही तर कृतीने दाखवून दिले. यातील काही आपल्याला घेता आलं, आत्मसात करता आलं, त्याही पुढे जाऊन आचरणात आणता आलं, तर तो खर्‍या अर्थाने शिक्षक दिन होईल.

– गौरी सरनाईक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news