लहानग्यांशी संवाद साधताय? ‘या’ टीप्‍स ठरतील फायदेशीर

लहानग्यांशी संवाद साधताय? ‘या’ टीप्‍स ठरतील फायदेशीर

आपले बाळ लहान असते तेव्हा हुंकार, रडणे हीच त्याची भाषा असते. आपल्या भावना ते काही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. बाळ लहान असते तेव्हा आईदेखील बोलताना संकेतांचा वापर करते. त्यामुळेच खुणा, संकेत याच्या मदतीने बाळ त्याला काय सांगायचे ते सांगायला शिकते. आपल्यापैकी कोणाला नुकतेच बाळ झाले असेल तर बाळाला संकेतांची भाषा शिकवताना आपल्याला जे सांगायचे ते सहजपणे कळेल अशीच शिकवा. त्यामुळे जेव्हा आपण आजुबाजूला नसू तेव्हा दुसर्‍या लोकांनाही त्याची भाषा सहजपणे समजेल.

स्वतःच शिका बाळाची भाषा : बाळाला सांकेतिक भाषा शिकवताना पालक म्हणून आपल्यालाही त्या भाषेचे ज्ञान असले पाहिजे. सुरुवातीपासूनच आपण त्याला आई, पाणी, दूध इत्यादी गोष्टींविषयी सांगायला शिकवले पाहिजे. अर्थात, घरात सर्वच लोकांनी एकाच प्रकारच्या संकेतांचा वापर केला पाहिजे नाहीतर बाळ गोंधळून जाईल. म्हणजे दुधाच्या बाटलीसाठी जर काही संकेत वापरत असाल तर घरातल्या बाकीच्यांनीही त्याच संकेतांचा वापर केला पाहिजे. नाहीतर बाळ नेमके काय सांगायचे हेच शिकणार नाही.

घाई करू नये : एखाद्या गोष्टीविषयीचा संकेत शिकल्यानंतरच बाळाला दुसरा शब्द शिकवावा. बाळाला शिकवण्याची घाई कामाची नाही. असे केल्यास बाळाला आपल्याला काय सांगायचे हेच कळणार नाही.

दैनंदिनीत सामील करा : लहान बाळांना जे संकेत शिकवत आहात ते रोजच्या आयुष्यात वापरा. बोलताना ते संकेत वापरा जेणेकरून लहान मुले हळूहळू कठीण गोष्टींचे संकेत शिकणेही सुरू करतील.

कार्यशील राहा : मुलांनी केवळ संकेत शिकणे पुरेसे नाही. बाळ अ‍ॅक्टिव्ह असले पाहिजे. उदा. बाळाच्या हाती खेळणे दिले किंवा त्याची आवडती वस्तू दिली तर ती त्याच्याकडे परत मागावी. आपल्याकडे यायला सांगावे. झोप आल्यास झोपण्याची कृती करून बाळाला शिकवावे.

शरीरभाषा शिकवावी : बाळाशी खेळता खेळता त्याला अनेक संकेत शिकवू शकतो. जसे बाळाला रुसणे, रागावणे, भीती वाटणे हे सर्व अभिनय शिकवू शकतो. आपल्या चेहर्‍यावरील हावभावांवरून बाळाला अनेक गोष्टी शिकवू शकतो.

चित्रांचा वापर करणे : बाळाला चित्रांच्या मदतीने सांकेतिक भाषा शिकवू शकतो. चित्र रंगीत आणि आकर्षक असली पाहिजेत. त्यामुळे बाळाला चित्रांचे आकर्षण वाटेल. एखाद्या बागेचे, कार्टूनचे चित्र दाखवावे. त्यामुळे विविध भाव-भावना दिसतात त्यामुळे बाळ लवकर शिकते.

अंजली महाजन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news