मनोरंजन : ‘टीडीएम’चं काय चुकलं?

मनोरंजन : ‘टीडीएम’चं काय चुकलं?
Published on
Updated on

'लोकांनी स्पष्ट मला सांगावं की तू सिनेमा करू नकोस. तू सिनेमाच्या लायक नाहीस. मी सिनेमा करणं बंद करीन.'
हे उद्गार आहेत भाऊराव कर्‍हाडे नावाच्या एका मराठी दिग्दर्शकाचे. कर्‍हाडेंचा पहिलाच सिनेमा 'ख्वाडा' हा दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवला गेला होता. त्यानंतर आलेल्या 'बबन'नेही चांगली कमाई केली होती. पण त्यांच्या 'टीडीएम' सिनेमाला मात्र म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही. पुरेसे शो मिळत नसल्याने आपल्या सिनेमाची अशी दुर्दशा कर्‍हाडेंना बघवली नाही.

इतकी मेहनत करूनही, प्रेक्षकांचा प्रतिसाद असूनही थिएटरमालक आपल्या सिनेमाचे पुरेसे शो लावत नसल्याने कर्‍हाडेंना रडू फुटलं. राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारणार्‍या, व्यावसायिक मूल्य असणारा आशयसंपन्न सिनेमा देणार्‍या दिग्दर्शकाला रडताना पाहणं हे एक मराठी सिनेरसिक म्हणून वेदनादायी वाटत असलं, तरी अशावेळी झाल्या प्रकाराच्या दोन्ही बाजू समजून घेणं अतिशय गरजेचं ठरतं.

गावात विहिरी खोदायचं, ट्रॅक्टरमधून रेती वाहायचं काम करणारा बाबू, त्याची प्रेयसी नीलम आणि गावातलं राजकारण-समाजकारण याभोवती 'टीडीएम'ची कथा फिरते. अहमदनगर जिल्ह्यातल्या एका गावात घडणारं हे कथानक जिवंत करताना कर्‍हाडेंनी ग्रामीण जीवनाचा आरसाच चंदेरी पडद्यावर आणलाय, ज्यात सहकारी संस्थांचं राजकारण, बेरोजगार तरुणांची दुनियादारी, लग्नात वधूपक्षाची होणारी फरफट आणि बरंच काही लख्ख दिसतं.

समाजव्यवस्थेत पिचलेला नायक आणि त्याचा संघर्ष हा कर्‍हाडेंच्या आजवरच्या 'ख्वाडा', 'बबन' आणि 'टीडीएम' या तिन्ही सिनेमांच्या कथानकाचा मूळ गाभा आहे. कुस्तीचा शौक असणारा बाळू आणि दूधविक्रीच्या व्यवसायातून स्वतंत्र रोजगाराची अपेक्षा करणारा बबन, या भाऊसाहेब शिंदेने साकारलेल्या दोन अस्सल, रांगड्या आणि स्वप्नाळू नायकांच्या पंगतीत कर्‍हाडेंनी आता पृथ्वीराज थोरातने साकारलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हर बाबूला नेऊन बसवलंय.

या सिनेमाचं नाव ही खरी मेख आहे. 'टीडीएम' म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या नगरच्या इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनातून हा शब्द नगरी जनतेत वेगाने पसरला. जॉब मागायला जाणारी ड्रायव्हर पोरं आपल्या रिझ्युममध्ये ड्रायव्हर न लिहिता 'टीडीएम' लिहून ती एक पदवी असल्यासारखं मिरवू लागली. बाबूही असाच एक 'टीडीएम' आहे.

'टीडीएम'च्या सोबतच रिलिज झालेल्या 'महाराष्ट्र शाहीर'मधल्या 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्याचे रील महिनाभर गाजले. अगदी सातासमुद्रापार जाऊन पोचले. पण 'टीडीएम'च्या गाण्यांना मात्र आपला वेगळा ट्रेंड सेट करण्यात अपयश आलं. अवतीभवतीच्या वातावरणाचा अंदाज घेऊन गाणं बनवणं आणि ते ट्रेंडला आणणं किंवा येणं आणि जनमानसात लोकप्रिय होणं याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'झिंगाट' हे गाणं!

सिनेव्यवसायातल्या अर्थकारण आणि राजकारणाचा फटका 'टीडीएम'ला बसला असला तरीही, त्याचं प्रमोशन आणि त्याला थिएटरमध्ये मिळालेले कमी शो याचा असलेला थेट संबंध दुर्लक्षून चालणार नाही. प्रमोशन करण्यासाठी बर्‍याच गोष्टी हाताशी असूनही 'टीडीएम'ची मार्केटिंग टीम त्यांचा पुरेपूर वापर करण्यात अपयशी ठरल्याचं साफ दिसून येतं. सिनेमाचं नाव आणि गाणी ही त्याची दोन प्राथमिक उदाहरणं.

मराठी सिनेमांचं अर्थकारण सध्या तरी पुणे आणि मुंबई या दोन शहरांवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रमोशन आणि मार्केटिंग करताना या दोन शहरांमधल्या प्रेक्षकवर्गाला प्राधान्य देण्याशिवाय पर्याय नाही. पुण्यातलं कोथरूड सिटीप्राईड थिएटर हा मराठी सिनेमांचा हॉटस्पॉट. खरं तर, या थिएटरमध्ये ट्रॅक्टरवरून वाजत-गाजत येऊन सिनेमाचा ट्रेलर लाँच करत कर्‍हाडेंनी प्रमोशनचा बार दणक्यात उडवला होता. पण पुढे मात्र या प्रमोशनल फटाक्यातली आग थंडावत गेल्याचं दिसलं.

अल्ट्रा मराठी, प्लॅनेट मराठी आणि 'खास रे टीवी'सारख्या प्रथितयश यू ट्यूब चॅनेलवर उशिराने प्रमोशन केल्याने म्हणावे तसे व्ह्यू आणि त्यातून तिकीटबारीवर अपेक्षित असलेलं आऊटपुट मिळालं नाही. 'चला हवा येऊ द्या', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सारखे रिअ‍ॅलिटी शो, लोकप्रिय टीव्ही मालिकांमधेही 'टीडीएम'ला बोलावलं गेलं नाही. परिणामी, प्रमोशन आणि मार्केटिंग या दोन्ही आघाड्यांवर 'टीडीएम' सपशेल अपयशी ठरला.

'टीडीएम'सोबतच 'महाराष्ट्र शाहीर' आणि 'पोन्नियीन सेल्वन 2' या बिग बजेट आणि बिग बॅनर सिनेमांनी थिएटरमध्ये दमदार एंट्री केली. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि ऑगस्ट एंटरटेन्मेंटसारख्या मोठ्या निर्मिती आणि वितरण संस्था 'महाराष्ट्र शाहीर'च्या पाठीशी आहेत. लायका प्रॉडक्शन आणि मद्रास टॉकीजची निर्मिती असलेला 'पोन्नियीन सेल्वन – 2' हा त्याच पेन इंडिया लिमिटेडने वितरित केलाय, ज्यांनी 'आरआरआर'चंही वितरण केलं होतं.

शाहीर साबळेंच्या आयुष्यावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा मराठीतले प्रथितयश दिग्दर्शक केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलाय, तर चोळ साम्राज्याची गाथा सांगणार्‍या 'पोन्नियीन सेल्वन 2'चं दिग्दर्शन 'पद्मश्री' मणिरत्नमने केलंय. एकीकडे अजय-अतुलचं संगीत तर दुसरीकडे ए. आर. रेहमानसारखा सुरांचा जादूगार उभा. या चढाओढीच्या वातावरणात कर्‍हाडेंनी 'टीडीएम'सारखा मोठं बजेट किंवा बॅनर पाठीशी नसलेला सिनेमा रिलिज करायचं धाडस दाखवलं. अर्थात याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. चांगला आशय असूनही 'टीडीएम'ला प्राईम टाईमचे शो मिळाले नाही. बाकी दोन्ही सिनेमांचे वितरक-निर्माते या व्यवसायात नवीन नाहीत. त्यांनी त्यांचा अनुभव आणि वशिला लावून जोरदार प्रयत्न केले आणि आपला सिनेमा टिकवला. कर्‍हाडेंकडे यूएफओसारखी वितरक संस्था असूनही त्यांना अपेक्षित परिणाम साधता आला नाही.

प्रथमेश हळंदे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news