पुणे: संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात फेकले टोमॅटो, नारायणगाव उपबाजारात भाव प्रचंड गडगडले
नारायणगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार असलेल्या नारायणगावात टोमॅटोचे भाव प्रचंड गडगडले. परिणामी संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातील मोकळ्या जागेत टोमॅटो टाकून आक्रोश व्यक्त करत टोमॅटो खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये मागील काही दिवसापासून बाजारभाव मिळत नसल्याने मालाची आवक कमी झाली होती. सोमवार व मंगळवार या दिवशी टोमॅटोचे बाजार थोड्याफार प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांनी बुधवारी (दि. २४) मोठ्या प्रमाणात टोमॅटो मार्केटला आपला माल विक्रीस आणला होता. त्यामुळे येथील टोमॅटो मार्केटमध्ये आवक वाढल्याने त्याच बरोबर पुणे, मुंबई येथे टोमॅटोचे बाजार भाव गडगडल्याने व्यापारी वर्गाने टोमॅटोची खरेदी जपून केली.
बुधवारी टोमॅटोची आवक वाढली होती. सकाळच्या सत्रात व्यापारी वर्गाने १०० रुपयापर्यंत मालाची खरेदी करून त्यांच्याकडे टोमॅटोच्या गाड्या शिल्लक होत्या. अशा परिस्थितीत अतिरिक्त टोमॅटो खरेदी करणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीसाठी घेऊन आलेले शेतकरी संतप्त होऊन त्यांनी बाजार समितीच्या आवारातच मोकळ्या जागेत टोमॅटो टाकून तीव्र आक्रोश व्यक्त केला. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेची माहिती मिळतात नुकतेच निवडून आलेले बाजार समिती संचालक माऊली खंडागळे, प्रियंका शेळके याचबरोबर बाबा परदेशी, प्रसन्ना डोके, संतोष नाना खैरे, नारायणगावचे माजी सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांनी मार्केट कमिटीत धाव घेऊन संतप्त शेतकऱ्यांना शांत केले. दुसरीकडे बाजार समितीचे सचिव व उप सचिव यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढून त्यांना शेतकऱ्यांनी आलेली टोमॅटो खरेदी करण्यास सांगितले.
उन्हाची तीव्रता वाढल्याने मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पन्न निघत आहे. त्यातूनच बाजारपेठेत येणारे टोमॅटो मोठ्या प्रमाणात लाल झाल्याने ती पुढील बाजारपेठेत विक्रीस नेईपर्यंत फुटतात तर काही खराब होतात. यामध्ये व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होते. आजमीतिला महाराष्ट्रसह बाहेर राज्यातही टोमॅटोला बाजार नाही. अशा परिस्थितीत माल खरेदी केला तर तो विक्री कुठे करायचा? असा प्रश्न आमच्या व्यापारी वर्गा समोर आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने आमची भूमिका समजून घेणे गरजेचे आहे.
– सतीश घोलप, टोमॅटो व्यापारी, नारायणगाव उपबाजार
टोमॅटो लागवडीपासून टोमॅटो उत्पन्न निघेपर्यंत शेतकरी वर्गाला एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. एवढा खर्च करून जर टोमॅटोला बाजारभाव मिळाला नाही तर शेतकऱ्याचे कंबरडे मोडते. आजमितीला खते, औषधे उधारीवर घेऊन शेतकरी शेती पिकवत आहे. यापुढील काळात शेतीमालाची परिस्थिती अशीच राहिली तर शेतकऱ्यासमोर आत्महत्या शिवाय पर्याय राहणार नाही.
– सचिन जठार, टोमॅटो उत्पादक शेतकरी
शेतकऱ्यांनी बाजार समितीत आणलेल्या मालाचे पैसे व्हावे, अशीच आमची भूमिका आहे. टोमॅटो मार्केटची व बाजारभावाची आजूबाजूच्या जिल्ह्यात परिस्थिती पाहता व्यापारी वर्गासमोर टोमॅटो खरेदी करणे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्य परिस्थितीत प्रशासकाच्या सूचनेनुसार बाहेर राज्यातून टोमॅटो खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना तातडीने फोन करून येण्यास सांगितले आहे. त्यांनी दि. २५ मे पासून जर टोमॅटोची खरेदी चालू केली नाही तर त्यांच्यावर बाजार समितीतर्फे कारवाई करण्यात येईल.
– रुपेश कवडे, सचिव, उपबाजार समिती नारायणगाव