तालुकास्तरावरही मिळणार हवामानाचा अंदाज

तालुकास्तरावरही मिळणार हवामानाचा अंदाज

कोल्हापूर, अनिल देशमुख : तालुकास्तरावरही हवामानाचा अंदाज मिळणार आहे. याकरिता पोर्टल स्वरूप यंत्रणा विकसित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचीही शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) जिल्हा पातळीवरचा हवामानाचा अंदाज दिला जातो. मात्र, राज्यातील सर्वच जिल्ह्यांची भौगोलिक रचना वेगळी आहे. यामुळे एकाच जिल्ह्यात हवामानाची वेगवेगळी परिस्थिती असते. जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस होतो तर त्याच जिल्ह्याच्या काही भागात त्याच वेळी पावसाचा थेंबही पडत नाही. यामुळे प्रत्येक तालुक्याचा स्वतंत्रपणे हवामानाचा अंदाज देता येईल का, याकरिता यशदाच्या संशोधन आणि नियोजन विभागाकडून यंत्रणा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

भारतीय हवामान विभाग (आयएमडी), भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था (आयआयटीएम), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए), भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) आणि राज्याचा कृषी विभाग यांच्या मदतीने ही यंत्रणा विकसित केली जाणार आहे. याबाबतच्या दोन बैठका आणि प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तिसर्‍या टप्प्यातील प्रशिक्षण लवकरच होणार आहे.

तालुका पातळीवर हवामानाचा अंदाज आतापर्यंत उपलब्ध होत नाही. तापमान, पाऊस याच्याही नेमक्या नोंदी मिळत नाही. तालुक्यातही बहुतांशी मंडल अधिकारी कार्यालयाच्या (सर्कल ऑफिस) परिसरात पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. यामुळे संपूर्ण तालुक्याचे पर्जन्यमान उपलब्ध होत नाही. परिणामी जिल्ह्याचेही अचूक पर्जन्यमान मांडता येत नाही.

नवी यंत्रणा विकसित झाल्यानंतर तालुकानिहाय हवामानाचा अंदाज कळणार आहे. त्यामुळे हवामान बदल आणि परिस्थितीबाबत अधिक अचूक माहिती उपलब्ध होईल. त्यातून कमीत कमी वित्त आणि जीवित हानी टाळण्यास मदत होणार आहे. कमीत कमी वेळेत रिअल टाईम डेटा मिळणार आहे. त्यामुळे विविध योजना, त्याचा लाभ, नव्या योजना, नवीन उपक्रम, धोरणात्मक निर्णय यासाठीही हे सहाय्यकारी ठरणार आहे.

या प्रशिक्षणासाठी आणि बैठकांसाठी पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यात 2005, 2006 तसेच 2019 व 2021 साली महापुराची स्थिती अतिगंभीर झाली होती. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची सर्व माहिती सध्या संकलित करून त्यावर अभ्यास करण्यात येत असून नव्याने विकसित होणार्‍या यंत्रणेसाठी त्याचा वापर केला जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news