कोल्हापूर : अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी कठोर निर्णय घ्या : अजित पवार

कोल्हापूर : अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी कठोर निर्णय घ्या : अजित पवार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी कठोर निर्णय घ्या, अशा सूचना देत, यासह जिल्ह्यातील विविध विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली. रंकाळा सुशोभिकरणाचा 'मास्टर प्लॅन' तयार करा, असे आदेशही त्यांनी दिले. कोल्हापूर विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 40 कोटींचा निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात विकासकामांची आढावा बैठक झाली. अंबाबाई मंदिर परिसरातील पूर्वीची आणि सध्याची परिस्थिती वेगळी आहे, असे सांगत पवार म्हणाले, वाहनांची संख्या वाढली आहे, भाविकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मंदिरात येणार्‍या भाविकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, याकरिता तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविला पाहिजे. मात्र त्यासाठी स्थानिकांचे पूर्ण सहकार्य पाहिजे. यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तर ते घ्या, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले.

बाधितांचे पुनर्वसन योग्य आणि चांगल्या प्रकारे कसे करता येईल, याचा निर्णय घ्या, असे सांगत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण होईल. यानंतर हा आराखडा उच्चाधिकार समितीसमोर सादर करून त्याला निधी देऊ, असेही पवार यांनी सांगितले.

रंकाळा विकास आराखडा

ऐतिहासिक वारसा असलेला कोल्हापुरातील रंकाळा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. कोल्हापूरकरांच्या त्याच्याशी भावना जोडलेल्या आहेत. यामुळे रंकाळा विकास आराखडा तयार करा, असे सांगत पवार म्हणाले, विकासकामांसाठी चांगले कॉन्ट्रॅक्टर नेमा, ही कामे करताना शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, हेरिटेज लूक कायम राहील याची दक्षता घ्या. रंकाळ्यासह शहर परिसरात दैनंदिन साफसफाईची पाहणी करून शहर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवा. सार्वजनिक खांबांवरील विद्युत व्यवस्था आवश्यक वेळेत सुरू ठेवा, असेही त्यांनी सांगितले.

पूरनियंत्रण आराखडा

कोल्हापूरचा दसरा महोत्सव 10 दिवस साजरा करण्यासाठी पर्यटन विभागाच्या मदतीने आराखडा तयार करा. काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे पहिल्या टप्प्यातील काम पावसाळ्यापूर्वी करून घ्या, धामणी प्रकल्पातील गावांना सानुग्रह अनुदानाच्या प्रस्तावाला शासन स्तरावरून मान्यता दिली जाईल. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रण आराखड्यास केंद्र शासनाकडून मान्यता दिली असून वर्ल्ड बँकेसमवेत सामंजस्य करार करण्याची कार्यवाही होईल, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर महापालिका जीएसटीच्या वाढीव दराचा प्रस्ताव, महापालिका नूतन इमारत, इचलकरंजी महापालिकेचा बंदिस्त सांडपाणी व्यवस्थापन व अन्य प्रस्ताव, नवीन विश्रामगृह इमारतीचे बांधकाम, विभागीय क्रीडा संकुलाचा विकास, बारामतीच्या धर्तीवर कोल्हापुरात ग्रंथालय उभारणी, माणगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणे, प्रशासकीय इमारत बांधकाम, जुन्या पुलांचे जतन व संवर्धन, केशवराव भोसले नाट्यगृह टप्पा क्रमांक 2 आदींबाबतही त्यांनी चर्चा केली.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विविध विकासकामे व आरखड्याबाबत माहिती दिली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आवाडे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासासाठीची कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, असे आवाहन केले. यावेळी आ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, आ. राजेश पाटील, आ. प्रकाश आवाडे, महापालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बिंदू चौक सबजेल स्थलांतरित करणार

* बिंदू चौक सबजेलच्या जागेवर पर्यटकांसाठी सुविधा कें द्र
* शाहू मिलची जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यासाठी लवकरच बैठक घेणार
* अमृत-2 अंतर्गत कोल्हापुरातील पाच सांडपाणी प्रकल्पांना लवकरच मंजुरी
* कन्व्हेंशन सेंटरची टेंडर प्रक्रिया सुरू; 300 कोटींची कामे लवकरच सुरू
* अभियांत्रिकी महाविद्यालयाचा 175 कोटींचा आराखडा; 1800 विद्यार्थ्यांची व्यवस्था

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news