गर्भावस्थेतील ३६ आठवडे ‘ही’ फळे, भाज्यांचे सेवन टाळा

गर्भावस्थेतील ३६ आठवडे ‘ही’ फळे, भाज्यांचे सेवन टाळा

आपण आई होणार ही आनंदाची बातमी कळल्यानंतर होणार्‍या आईने स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे अपेक्षित असते. अर्थात फक्त आराम करणे असा त्याचा अर्थ नसून शारीरिक, भावनिक तसेच योग्य आहार सेवनाचीही काळजी घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी गर्भावस्थेत काय करावे आणि काय करू नये याविषयी माहिती करून घ्यावी. गर्भावस्थेतील 36 आठवडे योग्य काळजी घ्यावी, त्यामुळे बाळही निरोगी जन्माला येईल.

गर्भावस्थेत आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे योग्य आहार. पौष्टिक आहार सेवन केल्यास महिला निरोगी राहीलच; परंतु गर्भातील बाळाचा शारीरिक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक विकास उत्तम पद्धतीने होईल. गर्भावस्थेत आहाराविषयी जागरूक राहिले पाहिजे कारण आईने पौष्टिक आहार सेवन केल्यास बाळालाही त्याचा लाभ होतो. गर्भावस्थेत काही पदार्थ, गोष्टी सेवन करू नयेत. तसेच काम करतानाही काय काळजी घेतली पाहिजे, हे जाणून घेतले पाहिजे; अन्यथा काही समस्यांना सामोरे जावे लागते. आहार-विहाराच्या या गोष्टींकडे पुरेसे लक्ष न दिल्यास बाळाच्या विकासावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

गर्भावस्थेदरम्यान खूप तेलकट, मसालेदार पदार्थ सेवन करू नयेत. असा आहार सेवन केल्यास पोटात वायू होणे, पित्त होणे तसेच छातीत जळजळ होण्यास सुरुवात होते. गर्भावस्थेत शक्यतो ताजे आणि घरी शिजवलेले अन्नपदार्थ सेवन करावेत. शक्यतो बाहेरील अन्नपदार्थ सेवन करणे टाळावे कारण त्यातून संसर्ग होण्याचा धोका असतो.

गर्भावस्थेत डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारची औषधे घेऊ नयेत. अगदी बारीकसा ताप आला किंवा सर्दी झाली तरीही शक्यतो औषधे घेऊ नयेत. घरगुती उपाय करू शकतो; मात्र औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच गर्भावस्थेत जड वस्तू उचलू नयेत. दीर्घकाळाचा प्रवास करू नये, तसेच गर्भावस्थेच्या काळात जिनाही चढू नये.

नोकरदार किंवा कामकाजी महिला असाल तर ऑफिसमध्ये खूप वेळ काम करू नये. खूप जास्त तणाव घेऊ नये. गर्भावस्थेत सुटसुटीत आरामदायक कपडे घालावीत. खूप घट्ट कपडे घालू नयेत, तसेच उंच टाचेची पादत्राणेही वापरू नयेत. गर्भावस्थेत व्यायाम जरूर करावा; मात्र तो डॉक्टरांनी सांगितलेला करावा. खूप धावपळ, उड्या मारणे आदी प्रकारातले व्यायाम प्रकार करू नयेत. गर्भावस्थेत खूप भीतीदायक, हिंसक चित्रपट, मालिका, बातम्या पाहणेही टाळावे.

ही फळे, भाज्या गर्भावस्थेत नको

गर्भावस्थेत फळे आणि भाज्या सेवन करण्यास सांगितले जाते; मात्र काही भाज्या आणि फळे ही विशेषतः गर्भावस्थेत टाळलीच पाहिजेत. शक्यतो गर्भावस्थेच्या पहिल्या काही दिवसांमध्ये पपई खाऊ नये. पपई ही उष्ण असल्याने गर्भावस्थेत ती सुरुवातीला धोकादायक ठरू शकते. गर्भावस्थेतील तिसर्‍या तिमाहीमध्ये पिकलेली पपई सेवन करता येऊ शकते, अर्थात डॉक्टरी सल्ल्याने. पपईत सी जीवनसत्त्व आणि इतर पौष्टिक घटक असतात. त्यामुळे स्तन्यपान करणार्‍या महिलांमध्ये दुधाबरोबर पपईचे सेवनही फायद्याचे असते.

गर्भावस्थेदरम्यान अननसाचे सेवन घातक ठरू शकते. अननसात ब्रोमेलिन असते, त्यामुळे गर्भाशयाची ग्रीवा किंवा योनीमार्ग नरम होतो आणि त्यामुळे प्रसूती लवकर होण्याची शक्यता असते.

शेवटच्या तिमाहीत डॉक्टर गर्भवतीला द्राक्ष खाण्यास मनाई करतात कारण द्राक्षे ही प्रकृतीने गरम असतात. त्यामुळे द्राक्षाचे अतिसेवन केल्यास मुदतपूर्व प्रसूती होण्याचा धोका संभवतो.

गर्भावस्थेत कोणतीही भाजी किंवा फळ सेवन करताना ती धुऊन घ्यावी. शक्यतो भाजी एक तासभर आधी पाण्यात भिजत घालावी, त्यामुळे फळांवर मारलेल्या रसायनांचा परिणाम कमी होतो.
कोणत्याही प्रकारचे मोडाचे कडधान्य कच्चा स्वरूपात सेवन करू नये.
गर्भावस्थेत वरील गोष्टींची काळजी घेतली तर हा काळ आरोग्याच्या द़ृष्टीने उत्तम जाईल आणि बाळ सुद़ृढ जन्माला येईल. तसेच गर्भवतीची तब्येतही कोणत्याही प्रकारची गुंतागुंत न होता उत्तम राहण्यास मदत होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news