पुणे : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपुर शर्माच्या बाबतीत तत्काळ कारवाई करण्यात आली, तशीच कारवाई राज्यपालांंवर आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींवरती करण्यात यावी, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये खासदार उदयनराजे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशीं संवाद साधला.
पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले की, छत्रपची शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि प्रेम बघायला मिळत आहे. मी रायगडावर गेलो तेव्हा तिथे मला प्रचंड वेदना झाल्या. काही कारण नसताना लोक शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानं करतात. महाराजांचा सन्मान झाला पाहिजे, ही सांगण्याची वेळ आली आहे. या पेक्षा दुसरी मोठी शोकांतिका नाही. ज्या प्रमाणे नुपुर शर्माच्या बाबतीत तत्काळ कारवाई करण्यात आली, तशीच कारवाई राज्यपालांंवर करण्यात यावी, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
राज्यपालांसह वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात पुणे शहरातील सर्व संघटना एकवटल्या आहेत. व्यापारी संघाने देखील शहर बंदला पाठिंबा दिला आहे. लक्ष्मी रोड परिसरातील सर्व दुकानं तीन वाजेपर्यंत बंद असणार आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यावरुन व्यापारी देखील आक्रमक झाल्याचं दिसत आहे.