T20 World Cup : इंग्लंड झाले टी-20 क्रिकेटचे नवे बादशहा

T20 World Cup : इंग्लंड झाले टी-20 क्रिकेटचे नवे बादशहा

निमिष पाटगावकर

यावर्षी इंग्लंडच्या इतिहासात एक नाही तर दोन राजांच्या नोंदी झाल्या. बकिंगहॅम पॅलेसला किंग चार्ल्सची सत्ता सुरू झाली तर इंग्लंडपासून हजारो मैल दूरवर मेलबर्नला इंग्लंडच्या क्रिकेट संघाने टी-20 क्रिकेटच्या (T20 World Cup) सम्राटपदाचा मुकुट चढवला. ज्या एकत्रित भारत-पाकिस्तानवर त्यांनी राज्य केले त्याचा एकामागोमाग एक पराभव करत त्यांनी हे सम्राटपद खेचून घेतले. ब्रिटिशांची दीडशे वर्षांची गुलामीची सत्ता असो वा क्रिकेटच्या मैदानातली, दोन्ही सत्तेचे एकच कारण म्हणजे उत्तम नियोजन. अ‍ॅडलेडला जशी निळाई लोटली होती आणि सामना जिंकल्यागतच आपण वागत होतो तसेच मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर आणि आसपास फक्त हिरवा रंग दिसत होता. इंग्लिश प्रेक्षक फार कमी प्रमाणात होते आणि ज्या भारतीयांनी वेगळ्या अपेक्षेपोटी सामन्याची तिकिटे काढली होती त्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने इंग्लंडला पाठिंबा जाहीर केला. क्रिकेटचा सामना हा मैदानावर खेळूनच जिंकता येतो आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा काहीही परिणाम नसतो हे इंग्लंडने दोनदा सिद्ध केले. अर्थात, त्यांना स्वतःबद्दल आत्मविश्वास होता तो त्यांच्या डेटा वापरून केलेल्या उत्तम नियोजनाचा. या सामन्यात पुन्हा बटलरने पाकिस्तानच्या प्रत्येक फलंदाजाच्या डेटाचा 360 डिग्री अभ्यास करून क्षेत्ररक्षण लावले होते.

मेलबर्नच्या ही खेळपट्टी दुटप्पी धोरणाची होती. खेळपट्टीवर गवत विशेष नव्हते आणि मुख्य म्हणजे मेलबर्नला पावसाचा जो अंदाज होता तो खोटा ठरला. शनिवारी रात्री इतका धो-धो पाऊस पडला की वाटले रविवारी नक्कीच मैदान ओले असणार, पण सकाळपासून छान ऊन पडले होते. जसजशी सामन्याची वेळ जवळ आली तसतसे आकाशात ढग जमायला लागले, पण त्यांचा उद्देश पाऊस पाडण्याऐवजी तिकिटाशिवाय सामना बघायचा होता. या हवामानामुळे खेळपट्टीत बाष्प उरले नाही आणि खेळपट्टी मंद झाली. या मंद खेळपट्टीमुळे धावा काढायला विशेष प्रयत्न लागणार हे नक्की होते. इंग्लंड आणि पाकिस्तानने आपले उपांत्य सामन्याचेच संघ अंतिम सामन्यासाठी ठेवले.

इंग्लंडने टॉस जिंकून अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानला फलंदाजीला आमंत्रण दिले. पाकिस्तानची मुख्य मदार रिझवान आणि बाबर यांच्या भागीदारीवरच होती, पण पहिल्या 3 षटकांत पाकिस्तानला एकही चौकार वसूल करता आला नाही. वोक्स आणि स्टोक्स प्रमुख गोलंदाज होते तसेच ते शेवटची षटके टाकणार हा अंदाज होता, कारण कुरेनचा डेथ ओव्हर्स टाकायचा अनुभव कमी आहे. ख्रिस वोक्स या खेळपट्टीमुळे द्विधा मनस्थितीत होता. त्याच्या स्पेलपैकी अर्धे चेंडू त्याने 105-110 च्या गतीने टाकून बघितले जेणेकरून फलंदाजांना फटके मारताना चेंडूच्या वेगाचा उपयोग होणार नाही, पण त्याने दिलेल्या एकूण धावांपैकी जास्त धावा या मंदगती चेंडूवर निघाल्या. जे चेंडू त्याने सरळ सिम ठेवून शॉर्ट ऑफ लेंग्थ टाकले त्याच्यावर पाकिस्तानी फलंदाजांना धावा काढता आल्या नाहीत.

पॉवर प्ले वाया जात असल्याने दडपण वाढून कुरेनला टार्गेट करायचा पाकिस्ताचा डाव बांधणीचा ठोकताळा होता, पण सॅम कुरेनने कमाल केली. त्याच्या 24 चेंडूंपैकी 15 चेंडू त्याने निर्धाव टाकले आणि 12 धावा देत 3 बळी घेतले. या कुरेनच्या गोलंदाजीत त्याचे जितके कौशल्य आहे तितकेच बटलरच्या क्षेत्ररक्षण रचनेचे आहे. रिझवानला त्याने सिम सरळ ठेवत उत्तम लेंथवर जखडून ठेवले. रिझवान पडल्यामुळे टायचे लक्ष विचलित झाले असेल कदाचित, पण एका फुल लेंथ चेंडूवर ज्याची दिशा ऑफ स्टम्पच्या किंचित बाहेर ठेवल्याने रिझवानने स्टम्पवर चेंडू ओढून घेतला. कुरेनचे पुढचे बळी म्हणजे पुन्हा बटलरच्या क्षेत्ररक्षण व्यूहरचनेची कमाल होती. मेलबर्नला स्क्वेअर सीमारेषा लांब आहेत तेव्हा कुरेनने आपल्या चेंडूचा वेग बदलत फलंदाजांना स्क्वेअरचे फटके मारायला भाग पडले ज्यासाठी बटलरने आपले दूरचे क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या खूप आत म्हणजे 10 ते 15 यार्ड आत उभे केले होते. मोहम्मद हॅरीसवर जलद धावा काढायचे दडपण होते तेव्हा तो फटकेबाजी करणार हे नक्की होते पण रशीदने आपल्या पहिल्याच चेंडूला उंची दिली आणि गती कमी केली. हॅरीसचा फटका अलगद बेन स्टोक्सकडे गेला. (T20 World Cup)

दुसरीकडे आदिल रशीद अपेक्षेप्रमाणे आपल्या लेगस्पिन आणि त्यापेक्षा जास्त गुगलीवर बाबर आझमला सतावत होता. बाबर आझमचा या स्पर्धेतील स्ट्राईक रेट हा पाकिस्तानच्या चिंतेचा विषय होता. स्पर्धेतील तो खेळलेल्या 133 चेंडूंमध्ये त्याने 62 चेंडू निर्धाव काढले आहेत. दुसर्‍या बाजूने मसूदने लिव्हिंगस्टोनवर आक्रमण चालू केले असल्याने बाबरला स्ट्राईक रोटेट करण्याशिवाय पर्याय नव्हता. आदिल रशिदने या स्पर्धेत खेळपट्टीचा वापर करत इतकी हुशारीने गोलंदाजी केली आहे. आपल्या सामन्यात त्याने सूर्याला अडकवले तर इथे एका उंची दिलेल्या गुगलीवर खेळताना चेंडूला अपेक्षित उंची मिळाल्याने बाबरला फटका खेळायला जागा मिळाली नाही आणि त्याने रशीदकडे झेल काढून दिला, रशीद आणि कुरेनने मिळून 8 षटकांत 32 धावा देत पाकिस्तानचा अर्धा संघ कापून काढला. पाकिस्तान टार्गेट देण्यात अपयशी ठरत आहे हे या सामन्याने पुन्हा सिद्ध झाले.

इंग्लंडला 138 चे लक्ष किरकोळ वाटत असले तरी पाकिस्तानच्या गोलंदाजीची कल्पना होती. शाहिन आफ्रिदीने हेल्सचा अप्रतिम चेंडूवर घेतलेला बळी सामना रंगतदार करेल, असे वाटत होते. नसीम शाहने इंग्लिश फलंदाजांना सतावले, पण त्याची लेंग्थ एकसारखी नव्हती या उलट हॅरीस रौफने पुन्हा एकदा या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करायची याचे प्रात्यक्षिक दिले. पाकिस्तानसारखेच इंग्लंडनेही शंभरी गाठायला 15 वे षटक घेतले तेव्हा सामन्यात चुरस पुन्हा वाढली, पण आफ्रिदीच्या दुखापतीमुळे पाकिस्तानचा तोटा झाला. मोईन अलीने आपले काम चोख केले तर बेन स्टोक्स इंग्लंडच्या विश्वचषक विजयात दुसर्‍यांदा तारणहार ठरला. इंग्लंडची फलंदाजी इतकी खोल होती की त्यांनी कधी हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ न द्यायची काळजी घेतली. (T20 World Cup)

इंग्लंडचे या स्पर्धेतील यश हे काही रातोरात मिळालेले नाही. विश्वचषक संघ बांधणी आणि त्या खेळडूंना योग्य सराव आणि विश्रांतीचे नियोजन त्यांनी केले. त्याचप्रमाणे मॉर्गनने आपला कर्णधारपदाचा मुकुट योग्य वेळी उतरवल्याने बटलरला पुरेसा वेळ मिळाला. व्यावसायिक क्रिकेटमध्ये भावनिक लुडबुड, वैयक्तिक कामगिरी आणि मीडियाचा फसवा प्रचार यांना किंमत नसते तर उपयुक्त डेटाचा योग्य वापर करत नियोजन करणे आणि सांघिक कामगिरी जास्त महत्त्वाची ठरते हे इंग्लंडने दाखवून दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news