T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपच्या वेळापत्रकात बदल

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपच्या वेळापत्रकात बदल

दुबई, वृत्तसंस्था : टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. रात्री 8 वाजल्यापासून भारतीय संघाचे सामने खेळवले जातील. उपांत्य फेरीच्या सामन्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना 27 जून रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये होणार होता; परंतु आता पहिला उपांत्य सामना येथे 26 जून रोजी होणार आहे. त्याचबरोबर 27 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.

याशिवाय पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होणार होता; मात्र आता येथे दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी होणार असून, 28 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. अंतिम फेरीत पोहोचणार्‍या संघाला प्रवासासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून असे करण्यात आले आहे.

आयसीसीनेही तिकीट विक्रीची केली घोषणा (T20 World Cup 2024)

भारतीय संघाचे सर्व गट सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होतील. भारत-पाकिस्तान सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. आयसीसीने टी-20 विश्वचषकासाठी तिकीट प्रक्रियाही जाहीर केली आहे. चाहत्यांना 1 ते 7 फेब्रुवारीदरम्यान तिकिटांसाठी ऑनलाईन विनंती करावी लागणार आहे. वेबसाईटवर प्रवेश केल्यानंतर चाहते सहा तिकिटांसाठी मागणी करू शकतात. त्यांचे तिकीट बुक झाले आहे की नाही, हे त्यांना मेलद्वारे कळवले जाईल आणि यासोबतच त्यांना पेमेंट लिंकही पाठवली जाईल; मात्र निर्धारित वेळेत पैसे भरले नाहीत तर 22 फेब्रुवारीपासून तिकीट सर्वसाधारण विक्रीसाठी जाईल. टी-20 विश्वचषक 2024 चे स्वरूप खूप वेगळे असेल. यावेळी 20 संघ चार गटांत विभागले जाणार आहेत. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील. यानंतर सुपर-8 संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल आणि दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news