पुढारी ऑनलाईन डेस्क : टी२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर इमरान खान सारखी कामगिरी करण्याची संधी होती. मात्र, पाकिस्तानी संघाला या संधीचे सोने करता आलेले नाही. (T20 World Cup Final 2022) सॅम करनचा भेदक मारा आणि बेन स्टोक्सच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने अंतिम सामन्यात विजय मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार निराश झाला आहे. सामन्यानंतर त्याने पराभवाची कारणे सांगितले आहेत. दरम्यान, बाबर आझमने इंग्लंडच्या संघाचे कौतुकही केले आहे.
बाबर आझम म्हणाला, आम्हाला विश्वचषकात प्रेक्षकांचे चांगले समर्थन मिळाले. आम्हाला या समर्थनामुळे मायदेशात खेळत आहोत, असे वाटत होते. आम्हाला दिलेल्या समर्थनासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो. आमचा सुरूवातीच्या २ सामन्यात पराभव झाला. मात्र, अंतिम ४ संघांमध्ये आम्ही ज्यापद्धतीने पोहचलो, ते अविश्वसनीय होते.
अंतिम सामन्यात खेळाडूंना मुक्तपणे खेळण्यास सांगितले होते. मात्र, २० धावा कमी पडल्या. आमची गोलंदाजी जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजीपैकी एक आहे. शाहिन आफ्रिदी जखमी झाल्याने आम्ही निराश झालो. तसेच इंग्लंडचा संघ चॅम्पियन बनण्यासाठी पात्र आहे, ते शेवटपर्यंत लढले, असेही बाबर यावेळी म्हणाला.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करन टी-२० विश्वचषक २०२२ चा 'प्लेयर ऑफ द टुर्नामेंट' ठरला आहे. (T20 World Cup) सॅम करनने या विश्वचषकात त्याने १३ विकेट्स पटकावल्या आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात त्याने भेदक मारा केला. अंतिम सामन्यात त्याने ४ षटकांमध्ये केवळ १२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. (T20 World Cup Final 2022)
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेल्या सॅम करनने अफगाणिस्तानविरूद्ध १० धावा देत ५ विकेट्स पटकावल्या होत्या. मात्र भारताविरुद्ध झालेल्या सेमी फायनलमध्ये त्याची पाटी कोरी राहिली होती. मात्र, आज पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत पाकिस्तानच्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्याच्या अचूक मार्यामुळे पाकिस्तान केवळ १३७ धावांपर्यंत मजल गाठू शकला. (T20 World Cup Final 2022)