T20 World Cup 2022 : ‘देव’घराचे दर्शन

T20 World Cup 2022 : ‘देव’घराचे दर्शन

कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले नाही तर त्या कोल्हापूरच्या भेटीला पूर्तता येत नाही तसेच अ‍ॅडलेडला जाऊन जर क्रिकेटच्या देवाच्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या घराला भेट दिली नाही तर ती अ‍ॅडलेड भेट पूर्ण होत नाही. परवाच्या बांगलादेश विरुद्धच्या थरारक सामन्यानंतर आजच्या अ‍ॅडलेड ओव्हलच्या डबल लढतींमध्ये कालचा वेळ जरा निवांत होता. क्रिकेट विश्वचषकाच्या माझ्या वेळापत्रकात हा दिवस मुद्दाम ब्रॅडमन भेटीकरता ठेवला होता. सर डॉन ब्रॅडमन यांचे घर 2, Holden Street  या अ‍ॅडलेड शहरापासून साधारण 30-40 मिनिटे दूर अशा अ‍ॅडलेडच्या उपनगरात आहे.

'द परेड' या मुख्य रस्त्यावर बस सोडून मी हॉल्डन स्ट्रीट या छोट्या गल्लीत शिरलो तेव्हा मनात आले ते इतक्या छोट्या गल्लीत इतका मोठा माणूस राहत होता. आपल्याकडे या रस्त्याचे नामकरण करून एव्हाना ब्रॅडमन रोड झाले असते. जमले असतेच तर एखादा ब्रॅडमॅनचा पुतळा गल्लीशी उभारला असता, पण इथे रस्ताही होल्डन स्ट्रीट होता आणि ब्रॅडमनच्या घराच्याही काही खाणाखुणा नव्हत्या. क्रिकेटच्या हिरव्यागार मैदानात धावांची बरसात करणार्‍या या महान फलंदाजाच्या घराभोवतीचा रस्ताही हिरव्यागार झाडीने सजला होता. ब्रॅडमनच्या घरापाशी जाणार इतक्यात एका म्हातार्‍या आजीबाईंनी घराच्या अंगणातून लक्ष वेधून घेतले. वॉकरच्या सहाय्याने चालणार्‍या आजींना सामान हलवायला मदत केली तर कळले त्यांच्या घरचा पत्ता 2, होल्डन स्ट्रीट होता म्हणजे त्या चक्क सर डॉन ब्रॅडमन यांच्या सख्खे शेजारी होत्या.

'अ‍ॅटकिन' नाव असलेल्या त्या 90 वर्षांच्या आजींना बोलते केले तेव्हा कळले त्यांचे आणि सर डॉन यांचे अगदी चांगले संबंध होते. मला आयुष्यात सर डॉन ब्रॅडमन यांना प्रत्यक्ष भेटायचा योग काही आला नाही, पण ब्रॅडमन दाम्पत्याबरोबर अनेक वर्षे शेजार केलेली आणि त्यांना जवळून ओळखणारी व्यक्ती देवाने माझ्यासमोर उभी केली होती. आजींचे वयोमानाप्रमाणे हात थरथरत होते, पण स्मरणशक्ती उत्तम होती. जेसी आणि डॉन दाम्पत्य इथे अतिशय साधेपणाने राहत होते. क्रिकेटच्या दुनियेचा अनभिषिक्त सम्राट आपण आहोत.

आपल्याइतकी कसोटी सरासरी राखणे या पृथ्वीतलावर कोणालाही शक्य होणार नाही इत्यादी सर्व बिरुदे विसरून हे दाम्पत्य इथे एका साधारण निवृत्तीचे जीवन जगत होते. परदेशी तसेही शेजार्‍यांच्या घरात डोकावून बघत नाहीत, पण या शेजारच्या आजींनी ब्रॅडमन यांच्या आठवणीला उजळणी देताना सांगितले की जेसी ब्रॅडमन काही प्रसंगी भेटायच्या, पण सर डॉन क्रिकेट दौर्‍यावर नसले तर घरातच राहणे पसंत करत. लोकांत मिसळणे त्यांना फारसे आवडायचे नाही. आपले खासगी आयुष्य त्यांना सार्वजनिक करायचे नव्हते. या अ‍ॅटकिन आजींनी सांगितले की सर डॉन ब्रॅडमन यांचा खासगी फोन नंबर होता.

या शेजार्‍यांकडे हा नंबर होता, पण कुणी या फोनवर फोन केला तर न उचलायची घरातल्या नोकर-चाकरांना तंबी होती. परदेशात नोकर-चाकरांची चैन तशी नसते, पण जेसी ब्रॅडमन यांचे 1997 ला निधन झाल्यावर सर डॉन यांची काळजी घ्यायला दोन पूर्णवेळ मदतनीस त्यांच्याबरोबर अखेरपर्यंत होते. या महान माणसाची अंतिम यात्राही टायच्या इच्छेप्रमाणे काही मोजक्या लोकांपुरती खासगी होती. ब्रॅडमनचे हे घर एकमजली सुबक विटकरी दगडांच्या बांधकामाचे आहे. याच्या बाहेरच्या काचा उत्तम आहेत. बाहेरचा वळणदार दगडी ड्राईव्ह वे छान राखला आहे. वास्तविक या घरात आता कोणी राहत नाही, पण या घराची इतकी उत्तम निगराणी केली आहे की तिकडे मी जास्त वेळ रेंगाळलो असतो तर सर डॉन बाहेर येऊन काही पाहिजे का विचारपूस करतील इतके ते राहते घर वाटते.

देव हा मूर्तीत थोडाच असतो? त्या वास्तूतून देवाच्या मूर्तीचे विसर्जन झाले असले तरी मंदिराचे पावित्र्य अबाधित होते. आळंदीला गेल्यावर ज्ञानोबा माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतानाही आपला देव तिथेच आहे, अशी भावना असते तसेच सर डॉन ब्रॅडमन यांच्या घराचे दर्शन घेताना झाले. ब्रॅडमन खासगी आयुष्यात कितीही साधे राहिले तरी त्यांचे मोठेपण बघायला अ‍ॅडलेड ओव्हलवर 'सर डोनाल्ड ब्रॅडमन कलेक्शन'ला भेट दिली तरी झलक मिळते. हे मोठेपण लपून राहण्यासारखे नव्हते आणि या कॅटवृक्षाच्या छायेत आलेली बाकीची झाडे लहानच राहतात. कुणाला ही मोठी छाया आधार वाटते तर कुणाला त्यातून बाहेर पडून आपले अस्तित्व जाणवावेसे वाटते ब्रॅडमन यांच्या मोठ्या मुलाने जॉनने सगळीकडे आपल्याला ब्रॅडमन यांचा मुलगाच म्हणून ओळखले जाते म्हणून आपले आडनाव बदलून 'ब्रॅडसन' केले.

सर डॉन ब्रॅडमन यांच्या निधनानंतर मात्र त्याला या ब्रँडची किंमत कळली आणि त्याने ब्रॅडमन यांचे नाव वापरण्यावरून भारतातील बिस्कीट कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती. आजही ब्रॅडमनचा मुलगा या घराच्या समोरच्याच भागात वेगळा राहतो. ब्रॅडमॅनलाही हे घर हेरिटेज वस्तू म्हणून द्यायचे नव्हते आणि असे पत्रही त्याने सरकारला पाठवले होते. हे घर हेरिटेज वास्तू म्हणून सरकार जमा झाले नाही तरी ते तसेच राहिले पाहिजे, असे सर्वसामान्य क्रिकेटरसिकाला वाटेत असेल. कारण त्यांचा देव तिथे राहिला होता. या वास्तूच्या दर्शनाने माझी अ‍ॅडलेड यात्रा सफल झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news