तरुणांमध्येही आढळताहेत अ‍ॅनिमियाची लक्षणे

तरुणांमध्येही आढळताहेत अ‍ॅनिमियाची लक्षणे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  बदलत्या जीवनशैलीचा फटका सध्या तरुणाईला बसू लागला आहे. पूर्वी विशेषतः महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळणारा अ‍ॅनिमिया हा आजार आता तरुण-तरुणींमध्येदेखील पाहण्यास मिळत आहे. 5 ते 10 टक्के युवक या आजाराला बळी पडत आहेत. प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे. मासिक पाळीमुळे महिलांमध्ये रक्तस्त्राव होतो. रक्ताची ही कमतरता बर्‍याचदा भरून निघत नाही. त्यामुळे महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त पाहण्यास मिळते. पर्यायाने कॉलेजवयीन तरुणी देखील या आजाराला बळी पडत आहेत. तर, बदललेली जीवनशैली, फास्टफूडचे वाढते प्रमाण, पौष्टिक आहाराकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध कारणांमुळे तरुणांच्या शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते. पर्यायाने, त्यांना अ‍ॅनिमिया हा आजार जडतो आहे.

आहाराकडे द्यावे लक्ष
अ‍ॅनिमिया आजार होऊ नये किंवा झाल्यानंतरही या आजाराचा प्रभाव ओसरावा, यासाठी प्रामुख्याने आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, सफरचंद, बीट, गूळ-शेंगदाणे, खजुर, काळ्या मनुका आदींचा समावेश करावा. त्याचप्रमाणे, तरुण-तरुणींनी दररोज 1 ग्लास दूध घेणे गरजेचे आहे.

अ‍ॅनिमिया या आजाराचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आढळते. मात्र, सध्या 5 ते 10 टक्के तरुण-तरुणींमध्येदेखील हा आजार पाहण्यास मिळत आहे. बदललेली जीवनशैली, फास्टफूडचे वाढते प्रमाण, पौष्टिक आहाराकडे होणारे दुर्लक्ष ही त्याची काही प्रमुख कारणे सांगता येतील. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
                                                    – डॉ. सायली तुळपुळे, एमडी, मेडिसीन.

अ‍ॅनिमियामुक्त भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये विशेष मोहीम राबविली जाते. दर सहा महिन्याने 1 ते 5 वर्षाच्या मुलांना जंताची गोळी देण्यात येते. अ‍ॅनिमियाची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून डॉक्टर इंजेक्शन किंवा गोळ्या देतात. तसेच, गंभीर परिस्थितीत गरज पडल्यास रुग्णाला रक्तदेखील द्यावे लागते.
    – डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news