पिंपरी(पुणे): पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील 18 मीटर व 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते यांत्रिक पद्धतीने साफसफाईचे काम 1 जूनपासून सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या कामात तब्बल 59 कोटीने वाढ झाली असली तरी, त्या कामासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे आग्रही आहेत. तर, दुसरीकडे या कामामुळे कामगारनगरीतील शेकडो सफाई कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून यांत्रिक पद्धतीने रस्तेसफाईची निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. खर्च अधिक असून, शेकडो कामगार बेकार होतात, म्हणून सत्ताधारी भाजपने ती निविदा हाणून पाडत फेटाळून लावली. अखेर, प्रशासकीय राजवटीत या निविदेस मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, हे काम तब्बल 59 कोटीने वाढवून 328 कोटी 95 लाख दराने मंजूर करण्यात आले आहे. पालिकेचे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याची गंभीर तक्रार सत्ताधारी भाजपच्या आमदाराने केली आहे. ही तक्रार भाजपला घरचा आहेर देणारी आहे. त्या तक्रारीला उत्तर देण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू आहे. सत्ताधारी भाजपच्या आमदाराकडून आरोप झालेले असतानाही निविदा रद्द न करता हे काम सुरू करण्याचा निर्णय आयुक्त सिंह यांनी घेतला आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला हे काम सुरू करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे होणार्या आर्थिक नुकसानीबाबत अधिकार्यांना घेणे- देणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.
रस्ते साफसफाईच्या चार विभागानुसार होणार्या कामासाठी प्रत्येकी मोठ्या आकाराचे 2 व मध्यम आकाराचे प्रत्येकी 2 असे एकूण 16 रोड स्वीपर व्हेईकल असणार आहेत. तर, धूळ उडू नये म्हणून पाणी फवारण्यासाठी प्रत्येक भागासाठी 1 असे 4 वॉटर टँकर असतील. कचरा व माती जमा करण्यासाठी प्रत्येकी 2 प्रमाणे एकूण 8 टीपर (हूक लोडर) असतील. जमा झालेला कचरा जमा करून तो मोशी कचरा डेपोत टाकण्यासाठी प्रत्येक भागासाठी 4 प्रमाणे एकूण 16 गॉबलर (लिटर पिकर) असतील. अशा पाच प्रकारची एकूण 44 वाहने असणार आहेत. ही सर्व वाहने चार ठेकेदार स्वखर्चाने उपलब्ध करून देणार आहेत. तर, एकूण 220 कर्मचारी नेमले जाणार आहेत. एका विभागासाठी सफाई कामगार 32, वाहनचालक 9, ऑपरेटर 10, हेल्पर 4 असे एकूण 55 जणांचे मनुष्यबळ असणार आहे. संपूर्ण शहराची साफसफाई 44 वाहने व 220 कर्मचार्यांद्वारे होणार आहे. पूर्वी या कामासाठी 2 हजारांपेक्षा अधिक सफाई कर्मचारी नेमले जात होते. यांत्रिकीकरणामुळे शेकडो कर्मचारी बेकार होणार आहे. परिणामी, त्यांचा रोजगार हिरावला जाणार आहे. त्यामुळे कामगार संघटनांनी आंदोलनही केले होते.
रोड स्वीपर व्हेईकलने 18 व 18 मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते तसेच, ज्याला जोडून असलेल्या पदपथाची दिवसाआड साफसफाई केली जाणार आहे. जमा झालेला कचरा मोशी कचरा डेपो येथे ठेकेदाराच्या वाहनांतून नेऊन टाकला जाणार आहे. तसेच, वाहने दुरुस्तीसाठी 60 किलोमीटर अंतराच्या परिघात एक वर्कशॉप तयार करण्याची अट करारात आहे. वाहन नादुरुस्त झाल्यास तात्काळ पर्यायी व्यवस्था करणे बंधनकारक केले आहे. या वाहनांवर पालिकेची यंत्रणा देखरेख व नियंत्रण ठेवणार आहे, असे पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले. या प्रकारे शहराचे दक्षिण व उत्तर असे दोन भाग करून नागरिकांच्या घराघरांतून कचरा संकलन करण्याचे कामातही अनेक अटी व शर्ती होत्या. त्यावर पदाधिकारी व अधिकारी भरभरून बोलत होते. आता, त्याबाबत अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे ठेकेदारांकडून मनमर्जी पद्धतीने कचरा संकलन केले जात आहे.
घंटागाडीची निश्चित वेळ नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वाहतूक करताना वाहनांतून कचरा रस्त्यांवर उडतो. रस्त्यांवरच ओला कचरा कॉम्पेक्टरमध्ये भरला जातो. कर्मचार्यांकडे आवश्यक सुरक्षा उपकरणे नसतात, यासारख्या अनेक तक्रारी कायम आहेत. कचरा संकलनाप्रमाणे यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईचे कामांची व्यवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे आहेत विभागानुसार चार ठेकेदार
क्षेत्रीय कार्यालयाचा भाग प्रतिकिमीनुसार दर ठेकेदार
अ, ब, ड, ग 1 हजार 680 रुपये इनेव्हेटिव्ही क्लिनिंग सिस्टीम प्रा. लि.
ब, ड, ग, ह 1 हजार 780 रुपये लॉयन्स सर्व्हिसेस
क, ह, ई 1 हजार 770 रुपये भूमिका टॉन्स्पोर्ट
अ, ब, फ 1 हजार 770 रुपये अॅन्थोनी वेस्ट हॅण्डलिंग सेल