तासगाव ; पुढारी वृत्तसेवा : तासगाव व नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा खासदार संजय पाटील यांच्या घराकडे कूच करीत असताना पोलिसांनी चिंचणी नाका येथे अडविताना पोलीस आणि स्वाभिमानी शेतकरी सघटनेच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमचक्री झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून मोर्चा रोखल्याने स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला. (MP Sanjay Patil)
प्रारंभी मोर्चा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून विटा नाका येथे आला. मोर्चा नियोजित पणे खासदार संजय पाटील यांच्या निवासस्थानी जाणार होता. मात्र पोलिसांनी चिंचणी रस्त्यावर मोर्चा रोखला.
यावेळी पोलीसांची व स्वाभीमानीच्या कार्यकर्ते याच्यात जोरदार धुमचक्री झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून मोर्चा विटा नाका येथे रोखून धरला.
यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडले. काही काळ रस्त्यातील वाहतूक खोळंबून राहिल्याने शहरातले आणि तासगाव विटा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आंदोलन स्थळी खासदार पाटील यांनी येऊन आंदोलकांची समजूत काढली. खासदार पाटील यांनी येत्या दोन तारखेपर्यंत ऊस बिले सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतो असे आश्वासन दिले.
पण शेतकऱ्यांनी ते मान्य केले नाही. आता २५०० रूपये नाही २८५० रुपये घेतल्याशिवाय माघार नाही. अशा घोषणा देत स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी शहरात निषेध फेरी काढली.