‘स्वाभिमानी’ने नऊ तास महामार्ग रोखला

‘स्वाभिमानी’ने नऊ तास महामार्ग रोखला
Published on
Updated on

कोल्हापूर/शिरोली, पुढारी वृत्तसेवा : गत हंगामात गाळप झालेल्या उसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता आणि यावर्षी 3 हजार 500 रुपये पहिली उचल, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (दि. 22) पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल 9 तास रोखून धरला. निर्णय होणार नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत भरउन्हातच कार्यकर्त्यांनी महामार्गावरील पंचगंगा पुलाजवळ ठिय्या मारला. महामार्गच रोखून धरल्याने मुंबई, पुणे, सांगली, सोलापूरसह कर्नाटकात जाणारी वाहतूक ठप्प झाली.

ऊस दरावरून गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मागणीबाबत आयोजित बैठका निष्फळ ठरल्याने 'स्वाभिमानी'ने महामार्गावर चक्का जामचा इशारा दिला होता. यामुळे सकाळपासूनच पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. महामार्गाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आले. जिल्ह्यासह सांगली, सातारा जिल्ह्यांतूनही सकाळी साडेआठ- नऊ वाजल्यापासूनच कार्यकर्ते आंदोलनस्थळी येत होते. सकाळी दहानंतर आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या मांडला. करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन माजी खासदार राजू शेट्टी दुपारी 12 वाजता आंदोलनस्थळी आले.

कोण म्हणतंय देत नाही..?

'कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही', 'ऊस आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा', 'एकच गट्टी, राजू शेट्टी,' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी महामार्ग दणाणून सोडला. आंदोलकांची संख्या उत्तरोत्तर वाढतच जात होती. दुपारी भरउन्हातही कार्यकर्ते महामार्गावरून बाजूला हटले नाहीत.

आता त्यांच्या विरोधात लढूच

आंदोलक म्हणून तडजोडीचीही तयारी ठेवली. 400 रुपयांऐवजी 100 रुपये घेण्याची तयारी दाखवूनही कारखानदार तडजोड करायला तयार नाहीत. सरकार आणि त्यांची मिलिभगत आहे. विरोधी पक्षदेखील आवाज काढायला तयार नाहीत. ते जर सर्वपक्षीय एकत्र येत असतील, तर आम्हीदेखील गट-तट, पक्षभेद विसरून शेतकरी म्हणून सरकार आणि कारखानदार यांच्याविरोधात लढू. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत महामार्गावरून बाजूला हटणार नाही, असा इशारा देत राजू शेट्टी यांनी ठाण मांडले. यावेळी राजेंद्र गड्ड्याण्णवार, प्रा. जालिंदर पाटील, युवा आघाडीचे अजित पोवार, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

100 रुपये देण्याची तयारी दर्शविल्याचा निरोप

शाहू महाराज यांनी दुपारी आंदोलनस्थळी येऊन शेट्टी यांची भेट घेतली. त्याचवेळी साडेचार वाजता जिल्हा प्रशासनाने काही कारखानदार शंभर रुपये देण्यासाठी तयार असल्याचा निरोप पाठवला. मात्र, याबाबत लेखी मसुदा मिळाल्यानंतरच आंदोलन थांबवू, असे शेट्टी यांनी सांगितले. यानंतर सायंकाळी सात वाजता जिल्हाधिकार्‍यांचे लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर महामार्गावरील चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आले.

महामार्गावरच जेवणाची पंगत

निर्णय होईपर्यंत उठायचे नाही, असा पवित्रा शेट्टी यांनी घेतल्याने आंदोलन कधी संपेल, हे स्पष्ट नव्हते. यामुळे कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी जेवणाची तयारी सुरू केली. काही ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी भोजनासाठी तांदळाची व्यवस्था केली, तर शिरोली ग्रामपंचायतीने भाजीपाला, गॅस, तांदूळ, पाणी याची सोय केली. दुपारी चार वाजेपर्यंत जेवण तयार करत, थेट महामार्गावरच पंगत बसवण्यात आली. शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना जेवण वाढले, नंतर त्यांनीही महामार्गावरच बसून जेवण घेतले. गावागावांतून कार्यकर्ते बाजरीच्या सुमारे सहा हजार भाकरी घेऊन आले होते. 400 किलो तांदळाचा यावेळी भात करण्यात आला. काहींनी दिवाळीचा फराळही आणला होता.

परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप

आंदोलनस्थळी सुमारे 1 हजार पोलिस कर्मचारी आणि 100 पोलिस अधिकारी, शीघ्र कृती दल, राज्य राखीव दलाच्या तुकड्या यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांची पथके, असा फौजफाटा तैनात होता. सर्वत्र पोलिस, त्यांची वाहने आदींमुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्यासह अधिकारी आंदोलनस्थळी होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news