Suryakumar Yadav Record : सूर्यकुमारने रोहित शर्माला टाकले मागे, कोहलीचा ‘विराट’ विक्रमही धोक्यात

Suryakumar Yadav Record : सूर्यकुमारने रोहित शर्माला टाकले मागे, कोहलीचा ‘विराट’ विक्रमही धोक्यात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav Record : विशाखापट्टणम येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने स्फोटक खेळी केली. त्याने 42 चेंडूत 80 धावा करून टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला. याचबरोबर सूर्याने टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचा एक विक्रम मोडीत काढला आणि कोहलीचा एक 'विराट' विक्रम तोडण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले.

सूर्यकुमारने प्रथमच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषवले. त्याच्या या मोहिमेची सुरुवात विजयाने झाली. कर्णधार या नात्याने तो कांगारू संघाविरुद्ध केवळ यशस्वी झाला नाही, तर पहिल्याच सामन्यात फलंदाज म्हणूनही चमकला. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरीला मागे टाकत त्याने 42 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 80 धावांची दमदार खेळी केली. सूर्यकुमारच्या खेळीचा भारताला फायदा झाला. तर रिंकू सिंहने उत्कृष्ट फिनिशर म्हणून आपला दबदबा कायम ठेवला. त्याच्या नाबाद 22 धावांच्या झटपट खेळीने अखेरच्या क्षणी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.

सूर्यकुमार (Suryakumar Yadav Record) त्याच्या दमदार खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आले. सूर्याला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13व्यांदा सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. याचबरोबर त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडला. रोहित 148 टी-20 सामन्यांमध्ये 12 वेळा सामनावीर म्हणून निवडला गेला आहे, तर सूर्यकुमारने 54 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा रन मशिन विराट कोहली आहे. त्याच्या नावावर 115 सामन्यांत 15 सामनावीराचे पुरस्कार आहेत. विराटला मागे टाकण्यासाठी सूर्याला आता तीन सामनावीर पुरस्कारांवर कब्जा करावा लागणार आहे.

'या'बाबतीत सूर्या दुसरा भारतीय

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करताना हा पुरस्कार जिंकणारा सूर्यकुमार यादव हा दुसरा भारतीय आहे. यापूर्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ही कामगिरी केली होती. या वर्षी आयर्लंड दौऱ्यावर बुमराहला कर्णधार बनवण्यात आले होते जिथे त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली. तसेच कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात सर्वोत्तम अर्धशतकी खेळी करणारा सूर्या हा दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम केएल राहुलच्या नावावर होता ज्याने पहिल्यांदा टीम इंडियाचे नेतृत्व करत अफगाणिस्तानविरुद्ध 62 धावांची खेळी केली होती.

षटकारांचे शतक पूर्ण

सूर्यकुमारने (Suryakumar Yadav Record) तिसऱ्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना षटकारांचे शतक पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो एकूण तिसरा आणि भारतीयांमध्ये दुसरा खेळाडू ठरला आहे. सूर्यकुमारच्या आधी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ही कामगिरी केली होती. सूर्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग केला.

सूर्याने 190.48 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. आतापर्यंत 54 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 46.85 च्या सरासरीने आणि 173.38 च्या स्ट्राईक रेटने 1921 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. सूर्याने 2021 मध्ये त्याचे टी-20 पदार्पण केले. तेव्हापासून या फॉरमॅटमध्ये त्याने खळबळ माजवली आहे. या फॉरमॅटमध्येही तो सध्या नंबर वन बॅट्समन आहे. एवढेच नाही तर प्रथम फलंदाजी करताना तसेच धावांचा पाठलाग करताना त्याचा फलंदाजीचे रेकॉर्ड उत्कृष्ट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news