बारामतीचा विषय आला की ताई आजवर 'माझा दादा खंबीर आहे, दादामुळे मला चिंता नाही', असे बोलत असायच्या. आता ऐनवेळी दादाने त्यांचा हात सोडल्याने गटांगळ्या खाण्याची वेळ त्यांच्यावर इथे आली आहे. बारामतीत सर्व सहकारी संस्था, कारखाने, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद-पंचायत समितीचे पदाधिकारी सदस्यांपासून ते नगरपरिषद सर्व संस्था अजित पवार यांच्याकडे आहेत. बारामतीला विकसित बनविण्यात त्यांचे योगदान सगळेच मान्य करतात. आता तर बाह्या सरसावून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर थेट टीका करू लागले आहेत. त्यामुळे ही जागा त्यांनी प्रतिष्ठेची केलेली दिसून येते. त्यामुळे आत्तापासूनच ते पूर्ण ताकदीने बांधणी करत आहेत.
भाजप पदाधिकार्यांची गोची
अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्याने साहजिकच शिंदे गट व भाजपला त्यांच्यासोबत जावे लागेल. बारामतीत भाजपची थोडी फार ताकद निर्माण होऊ लागली होती. परंतु खुद्द अजित पवार तिकडे गेल्याने येथील भाजप पदाधिकार्यांची मोठी गोची झाली आहे. पवार विरोध हाच त्यांचा आजवरचा अजेंडा होता. आता युती धर्म पाळण्यासाठी त्यांना अजित पवारांचेच काम करावे लागेल. त्यांनी मनापासून साथ दिली नाही तरीही पवार यांना फार धक्का बसेल, अशी स्थिती इथे नाही. शिंदे गट कार्यरत असला, तरी त्यांची फारशी ताकद नाही.महायुतीच्या विरोधात इथे इंडिया आघाडीकडून सुप्रिया सुळे लढतील. बारामतीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) यांची ताकद नगण्यच आहे. त्यामुळे सुळेंचा मार्ग अधिकच खडतर आहे.