Bullock Cart races and Jallikattu | हुर्ररररर…! महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पुढारी ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने आज तामिळनाडूतील पारंपरिक खेळ जल्लीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीबाबत महत्त्वाचा निर्णय दिला. तामिळनाडूतील जल्लीकट्टू, कर्नाटकातील कंबाला आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना परवानगी देणारे कायदे सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले आहेत. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा (तामिळनाडू सुधारणा) कायदा, २०१७ हा पारंपरिक खेळांदरम्यान प्राण्यांना होणारा त्रास कमी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच 'जल्लीकट्टू' हा तामिळनाडूच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हणत जल्लीकट्टू आणि बैलगाडी शर्यतींना परवानगी देणाऱ्या राज्यांच्या कायद्यांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या बैलगाडाच्या शर्यती तसेच तामिळनाडूतील जलीकट्टू खेळाला देण्यात आलेल्या परवानगीला आक्षेप घेत अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. बैलगाडी शर्यती आणि जलीकट्टूला देण्यात आलेली परवानगी घटनाबाह्य असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. तामिळनाडू सरकारने जलीकट्टूला परवानगी देण्याच्या अनुषंगाने प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यात सुधारणा केली होती. अशीच कायद्यातील सुधारणा महाराष्ट्र सरकारकडून देखील करण्यात आली होती. तामिळनाडूतील कायद्यासंदर्भात घटनापीठासमोर सुनावणी होणे आवश्यक आहे, कारण त्यात घटनात्मक मुद्दे असल्याचे काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते.

न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सर्व याचिकाकर्ते, प्रतिवादी, केंद्र सरकार, तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकार आणि इतरांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गेल्या वर्षी ८ डिसेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती जोसेफ यांच्यासह न्या. अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषीकेश रॉय आणि सी टी रविकुमार यांचा समावेश असलेल्या घटनापीठाने यावर आज अंतिम निकाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी असे म्हटले होते की प्राणी क्रूरता प्रतिबंध (तामिळनाडू दुरुस्ती) कायदा, २०१७ ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मोठ्या घटनापीठाने निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण त्यामध्ये संविधानाच्या व्याख्येशी संबंधित महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश आहे.

पोंगल सणादरम्यान जल्लीकट्टू खेळ आयोजित केला जातो. हा तामिळनाडूचा पारंपारिक खेळ आहे. या खेळात वळूंवर नियंत्रण मिळवून त्यांना वश केले जाते. या खेळाला सुमारे दोन हजार वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींनादेखील मोठी परंपरा आहे. जत्रा आणि उत्सवादरम्यान महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जाते. यामागे ग्रामीण भागातील अर्थकारण अवलंबून आहे.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news