पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं नवं पर्व सुरु झालंय. मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे सरकलं असून जयदीप-गौरीच्या मृत्यूनंतर त्यांच्याच रुपात नित्या-अधिराजने पुनर्जन्म घेतलाय. पुनर्जन्माचा हा प्रवास उत्कंठावर्धक आहेच. त्यासोबतच मालिकेतली अनेक नवी पात्र प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत. नित्या-अधिराजसोबतच सध्या राजमा ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. राजमा बोलू शकत नाही. लहान असताना तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला आणि त्यात तिची वाचा गेली. राजमाचा भूतकाळ नेमका काय आहे? नित्या आणि जयदीपसोबत राजमाचं काय नातं आहे? याची कमालीची उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या –
राजमाची भूमिका साकारतेय अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर. मृण्मयी मुळची पुण्याची. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. हीच आवड जोपासत तिने शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. नृत्याची आवड आणि अभिनयासाठी तिने मुंबई गाठली. मृण्मयीने अनेक रिॲलिटी शोजमध्ये सहभाग घेतला आहे आणि ती विजेतीही ठरली आहे.
अनेक मालिकांमध्येही मृण्मयीने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. स्टार प्रवाहसोबतची तिची ही पहिली मालिका आहे. इतक्या लोकप्रिय मालिकेचा भाग होताना अतिशय आनंद होतोय अश्या शब्दात तिने आपली भावना व्यक्त केली. राजमा बोलू शकत नाही. न बोलता भावना व्यक्त करणं आव्हानात्मक आहे. अश्या पद्धतीचं पात्र मृण्मयीने याआधी साकारलेलं नाही. त्यामुळे राजमा साकारताना नवनव्या गोष्टी शिकायला मिळत असल्याचं मृण्मयी म्हणाली.