सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात नुकताच गळीत हंगाम सुरू झाला असून ट्रक, ट्रॅक्टर- ट्रॉली, बैलगाडीतून उसाची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, हीच वाहतूक जीवघेणी ठरू लागली आहे. ऊस ट्रॉलीचे जुगाड अनेकदा अपघाताला कारणीभूत ठरू लागले आहे.लोणंदमध्ये या वाहतुकीने पहिला बळी घेतला. हंगाम आणखी चार ते पाच महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे या काळात आणखी बळी जाऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गुरूवारी रात्री लोणंदमध्ये गणी कच्छी या वृध्दाला ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. महामार्गांसह प्रमुख रस्त्यांवर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रेलर्स, बैलगाड्या तसेच रस्त्याकडेला चुकीच्या पद्धतीने पार्क केलेले ट्रकसह इतर वाहनेही अनेकांच्या जिवावर बेतू लागली आहेत.
जिल्ह्यात सध्या 16 साखर कारखाने सुरू आहेत. ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडीतून उसाची वाहतूक केली जात आहे. जिल्ह्यात एक हजारहून अधिक ट्रॅक्टरव्दारे उसाची वाहतूक केली जात आहे. उसाची सिंगल ट्रॉली व डबल ट्रॉलीतून वाहतूक केली जाते. ऊस वाहतूक करताना लाईटचा वापर करताना ट्रॅक्टर चालकांकडून हयगय केली जात असल्याचे पहायला मिळत आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या पाठीमागे लाईट, रिफलेक्टर नसल्याने मोठे अपघात होत आहेत. यामध्ये वाहनचालक किरकोळ जखमी होत असून रात्रीचा प्रवास धोकादायक ठरत आहे.
अनेक ट्रॅक्टरचालक फक्त एकाच हेड लाईटचा वापर करतात. त्यामुळे समोरून येणार्या वाहनधारकांची फसगत होऊन समोरून दुचाकी येत असल्याच्या अंदाजाने वाहनधारक वाहन चालवतात. मात्र अचानक ट्रॅक्टर समोरून आल्यास या ट्रॅक्टरवर वाहने आदळण्याचे प्रकार वाढले आहेत. दुसरीकडे सिंगल व डबल ट्रॅक्टरच्या मागे ब्रेक लाईट नसतो. फक्त रिफेलेक्टरच्या अंदाजाने वाहन चालवावे लागते. अनेक ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफलेक्टर नाहीत तर काही ट्रॉलींना जुनेच रिफलेक्टर असल्याने ते खराब झाले आहेत. ट्रॅक्टरच्या मागे एक लाईट असावा, अशी सूचना ट्रॅफिक पोलिसांकडून दरवर्षी केली जात असताना ट्रॅक्टर चालक याकडे दुर्लक्ष करतात. आरटीओ विभागही ट्रॅक्टर चालकांना मागे लाईट लावण्याबाबत पाठपुरावा करत नाहीत.