वटवाघळांच्या अभ्यासातून सापडणार मधुमेह नियंत्रणाचा मार्ग

वटवाघळांच्या अभ्यासातून सापडणार मधुमेह नियंत्रणाचा मार्ग

न्यूयॉर्क : गोड खाण्याची आवड असणारे मनुष्य हे एकमेव सस्तन प्राणी नाहीत. अन्यही अनेक प्राण्यांना गोड खाण्याची आवड असते. त्यामध्येच 'फ्रू ट बॅटस्' या नावाने ओळखल्या जाणार्‍या वटवाघळांच्या एका प्रजातीचा समावेश होतो. ते दिवसातून त्यांच्या वजनाच्या दुप्पटीइतकी गोड, शर्करायुक्त फळे खातात. माणसाला गोड आहार अधिक प्रमाणात घेतला, तर मधुमेहाचा धोका संभवतो. मात्र, या वटवाघळांमध्ये असा साखरयुक्त आहार घेऊनही निरोगी राहण्याची क्षमता असते. जी वटवाघळे किटकांना आपला आहार बनवत असतात त्यांच्या तुलनेत या वटवाघळांमध्ये आपल्या रक्तातील साखरेचा स्तर अधिक वेगाने कमी करण्याची क्षमता असते. आता या क्षमतेचा अभ्यास करून संशोधक माणसामधील मधुमेह नियंत्रणाचा मार्ग शोधणार आहेत.

संशोधकांच्या या टीममध्ये बायोलॉजिस्ट आणि बायोइंजिनिअर्स आहेत. उच्च शर्करायुक्त आहार घेऊनही ही वटवाघळे स्वतःला निरोगी कसे ठेवतात हे आता पाहिले जाणार आहे. 2019 मध्ये जगात मधुमेह हे मृत्यूचे नवव्या क्रमांकाचे सर्वात मोठे कारण होते. शर्करेवर परिणामकारक प्रक्रिया करण्यात शरीराला अपयश येत असेल, तर मधुमेहाचा विकार उद्भवत असतो. या कारणामुळे रक्तात ग्लुकोजचे म्हणजेच साखरेचे प्रमाण वाढत असते. त्याचा दुष्परिणाम मुत्रपिंडासारख्या अंतर्गत अवयवांवर होत असतो.

आता याबाबतच्या नव्या संशोधनाविषयीची माहिती 'नेचर कम्युनिकेशन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधक 'आर्टब्यिूस जमैसेन्सिस' असे वैज्ञानिक नाव असलेल्या फळ वटवाघळांच्या पेशींमधील डीएनएचा यासाठी अभ्यास करीत आहेत. त्याची तुलना ते किटकांचा आहार घेणार्‍या 'एप्टेसिकस फ्युस्कस' असे वैज्ञानिक नाव असलेल्या मोठ्या, करड्या रंगाच्या वटवाघळांमधील डीएनएशी करीत आहेत. या दोन्ही वटवाघळांमधील जनुकीय व पेशीय रचनेतील फरक शोधला जाईल. कोणत्या विशिष्ट जनुकांमुळे फ्रूट बॅटस्मध्ये रक्तातील साखर वेगाने कमी करण्याची क्षमता असते हे तपासले जाईल. त्यामधून मनुष्यांमध्ये मधुमेह नियंत्रणासाठी कोणते उपाय करता येतील याचा शोध घेतला जाईल.

१. गोड फळांचा आहार घेणारी वटवाघळे वेगाने कमी करतात रक्तातील साखर
२. 'फ्रूट बॅटस्'च्या डीएनएचा अभ्यास सुरू
३. शरीराच्या वजनाच्या दुप्पटीने गोड आहार घेऊनही राहतात निरोगी
४. या विशिष्ट प्रजातीमधील क्षमतेचा वापर मधुमेह नियंत्रणासाठी होईल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news