मंचर : उच्च माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची प्रेमप्रकरणे चांगलीच बहरत आहेत. ही प्रकरणे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यास पालक पोलिस ठाण्यात न जाता विद्यालयात कुटुंबासह जाऊन याचा जाब शिक्षकांना विचारत आहेत. यामुळे अनेक माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिकमधील शिक्षकांच्या डोक्याला ताप झाला आहे. कोरोना काळात शाळा, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक महाविद्यालय बंद होती. त्यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवत होते. याच काळात अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिले. बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार सर्व विषयांचा अभ्यास हा मोबाईलमध्ये उपलब्ध असल्याने शाळा, माध्यमिक विद्यालयापासून उच्च माध्यमिक विद्यालयापर्यंत सर्व विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर वाढला आहे.