पुणे; पुढारी वृत्तसेवा : आरोग्य विभागातील बदल्या कायमच चर्चेचा विषय असतात. मोक्याची व मलईदार पदे मिळविण्यासाठी चढाओढ लागलेली असते. याच संधीचा फायदा घेत अधिकार्यांच्या बदल्या केल्या जातात. परंतु, यातून होणार्या
घोडेबाजारास आता लगाम लागणार आहे. यंदा बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणार आहेत.
आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी (गट अ वर्ग 2) बदल्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यावर वैद्यकीय अधिकार्यांना अर्ज करण्यासाठी 20 मे ही अखेरची मुदत देण्यात आली होती. ज्यांना एका ठिकाणी 3 वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा वैद्यकीय अधिकार्यांना बदलीसाठी ऑनलाइन अर्ज करून इच्छित ठिकाण निवडायचे आहे. त्यानुसार बदल्यांचे आदेश जारी करणार असल्याचे सांगण्यात आले.
वैद्यकीय अधिकार्यांच्या बदल्यांसाठी बहुतांश वेळा 'अर्थ'पूर्ण व्यवहार केले जातात. लाखो, कोट्यवधी रुपये खर्च करुन इच्छित ठिकाणी बदली करून घेण्यासाठी धडपड केली जाते, ओळख्यांच्या वापर केला जातो. त्यामुळे बदली प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शी
राहत नाही. मात्र, आता ऑनलाइन सॉफ्टवेअरमुळे या गोंधळाला काहीसा लगाम बसू शकणार आहे. वैद्यकीय अधिकार्यांच्या अनुभवानुसार किंवा सेवा ज्येष्ठतेनुसार अर्ज न करताही बदली होणार आहे.