Stock Market Updates | MRF ने रचला इतिहास, १ लाखाचा टप्पा ओलांडणारा बनला पहिला शेअर

Stock Market Updates | MRF ने रचला इतिहास, १ लाखाचा टप्पा ओलांडणारा बनला पहिला शेअर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : देशांतर्गत महागाई कमी झाल्याने शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी राहिली आहे. मे महिन्यात देशांतर्गत किरकोळ महागाई दर दोन वर्षांच्या निचांकी स्तरावर आला आहे. तसेच गुंतवणूकदार आता अमेरिकन महागाईच्या आकडेवारीची आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयाची वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत व्यवहार करत आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३३७ अंकांनी वाढून ६३ हजारांवर होता. निफ्टी १८,७०० जवळ पोहोचला आहे. दरम्यान, MRF शेअर्सने आज १ लाखाचा टप्पा ओलांडला.

एमआरएफने ओलांडला १ लाखाचा टप्पा

टायर निर्माता एमआरएफ (MRF shares) चा शेअर मंगळवारी शेअर बाजारात एक नवीन मैलाचा दगड ठरला. हा १ लाखाचा टप्पा ओलांडणारा पहिला शेअर बनला आहे. MRF शेअरने १.३७ टक्के वाढ नोंदवून BSE वर १,००३०० चा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. मे महिन्याच्या सुरुवातीला स्पॉट मार्केटमध्ये १लाखाचा टप्पा गाठण्यासाठी MRF अवघ्या ६६.५० रुपयांनी कमी होता. ८ मे रोजी फ्युचर्स मार्केटमध्ये त्याने महत्त्वाची पातळी ओलांडली होती.

भारतात, MRF हा सर्वात जास्त किंमत असलेल्या शेअर्सच्या यादीत अव्वल आहे. हनीवेल ऑटोमेशनचे शेअर्स आज ४१,१५२ रुपये किमतीला विकले जात होते, तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर या यादीत पेज इंडस्ट्रीज, श्री सिमेंट, 3M इंडिया, अॅबॉट इंडिया, नेस्ले आणि बॉश यांचे शेअर्स आहेत.

गेल्या ३ महिन्यांत सुमारे ४२,५०० कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या या शेअर्समध्ये सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. चेन्नई स्थित कंपनीचे एकूण ४२,४१,१४३ शेअर्स आहेत, त्यापैकी ३०,६०,३१२ शेअर्स सार्वजनिक भागधारकांच्या मालकीचे आहेत. ज्याचे प्रमाण एकूण इक्विटीच्या ७२.१६ टक्के एवढे आहे. प्रमोटर्सकडे ११,८०,८३१ शेअर्स आहेत, जे एकूण इक्विटीच्या २७.८४ टक्के आहेत.

सेन्सेक्सवर आयटीसी, एचयूएल आणि एशियन पेंट्स हे टॉप गेनर आहेत. हे शेअर्स सुमारे १ टक्क्याने वाढले. नेस्ले, इन्फोसिस, टायटन, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, टाटा स्टील हेदेखील वधारले आहेत. केवळ एल अँड टी आणि कोटक महिंद्रा बँक हे घसरले आहेत.

आयनॉक्स विंड एनर्जीच्या एकत्रीकरणाच्या योजनेला कंपनीने मान्यता दिल्यानंतर आयनॉक्स विंडचे शेअर्स (Shares of Inox Wind) सुमारे ४ टक्क्यांनी घसरले.

जागतिक बाजारातील स्थिती

इकॉनॉमिक डाटा आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयापूर्वी अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी राहिली आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) हा ०.६ टक्के घसरून ३४,०६६ वर पोहोचला. तर एस अँड पी (S&P 500) ५०० हा देखील वधारला आहे. तर नॅस्डॅक कंपोझिटने (Nasdaq Composite) १.५ टक्के वाढून १३,४६२ वर झेप घेतली. दरम्यान, आशियाई बाजारात संमिश्र वातावरण आहे. टोकियो, सेऊल, वेलिंग्टन आणि तैपेई येथील शेअर बाजारात तेजी आहे. पण हाँगकाँग, शांघाय, सिडनी, सिंगापूर, मनिला आणि जकार्ता येथील बाजारात नकारात्मक वातावरण आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news