Stock Market Today : जागतिक आर्थिक मंदीमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. यामुळे भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक गुरुवारी (दि.१९) घसरले. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स २८४ अंकांनी खाली येऊन ६०,७०० वर तर निफ्टीने १८ हजारांवर व्यवहार केला. बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी स्टॉक्समध्ये सर्वाधिक नुकसान दिसून आले.
सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, कोटक बँक यांचे शेअर्स घसरले. त्याशिवाय इन्फोसिस, एचयूएल, टेक महिंद्रा, एल अँड टी आणि विप्रो यांचे शेअर्सदेखील घसरणीसह खुले झाले होते. ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, इंडसइंड आणि आयटीसी यांचे शेअर्स वधारले आहेत. क्षेत्रीय निर्देशांकांत निफ्टी मेटल ०.८१ टक्के आणि निफ्टी आयटी ०.४६ टक्क्यांनी घसरला. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्सियलदेखील घसरणीसह खुला झाला.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अधिकार्यांकडून व्याजदरवाढीबाबत होत असलेली वक्तव्ये, कमकुवत आर्थिक डेटा, आर्थिक मंदीची धास्ती यामुळे अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली आहे. S&P 500 आणि Dow Jones Industrial Average हे निर्देशांक सुमारे २ टक्क्याने घसरले आहेत. एका महिन्याहून अधिक काळातील ही सर्वात मोठी घसरण आहे. आर्थिक मंदीची धास्ती गुंतवणूकदारांनी घेतली आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटत आहेत.
डाऊ जोन्स निर्देशांक ६१३ अंकांनी घसरून ३३,२९६ वर आणि S&P 500 हा निर्देशांक ६२ अंकांनी घसरून ३,९२८ वर आला. तर नॅस्डॅक कंपोझिट १३८ अंकांनी घसरून १०,९५७ वर आला. अमेरिकेतील घसरणीचा मागोवा घेत व्यवहार सुरु केलेल्या आशियाई बाजारांनाही तेजी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. (Stock Market Today)
हे ही वाचा :