Stock Market Closing Bell | बजेटपूर्वी बाजारात उत्साह! सेन्सेक्स ६१२ अंकांनी वाढून बंद, गुंतवणूकदारांना ४.६२ लाख कोटींचा फायदा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन : उद्याच्या अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयापूर्वी बुधवारी शेअर बाजारात उत्साह दिसून आला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स सुमारे ७०० अंकांनी वाढून ७१,८५० पार झाला. तर निफ्टीने २१,७०० ची पातळी ओलांडली. त्यानंतर सेन्सेक्स ६१२ अंकांच्या वाढीसह ७१,७५२ वर स्थिरावला. तर निफ्टी २०३ अंकांनी वाढून २१,७२५ वर बंद झाला. (Stock Market Closing Bell) बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे १.५ टक्के आणि १.८ टक्क्यांनी वाढले. विशेष म्हणजे सलग सहाव्या सत्रात एकदिवस तेजी आणि एक दिवस घसरण असा पॅटर्न शेअर बाजारात पहायला मिळाला.

गुंतवणूकदारांना ४.६२ लाख कोटींचा फायदा

बाजारातील तेजीत आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली. याआधी ३० जानेवारी रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३७५.२० लाख कोटी रुपये होते. ते आज ३१ जानेवारी रोजी ३७९.८२ लाख कोटी रुपयांवर गेले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४.६२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

संमिश्र जागतिक संकेतांमध्ये बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली होती. पण त्यानंतर रिकव्हरी करत त्यांनी तेजीत व्यवहार केला. क्षेत्रीय पातळीवर निफ्टी फार्मा आघाडीवर राहिला. तिसऱ्या तिमाहीच्या मजबूत निकालानंतर सन फार्माचा शेअर्स सुमारे ४ टक्क्यांनी वाढला. यामुळे निफ्टी फार्मा २ टक्क्यांनी वधारला. इतर क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. बँक, पीएसयू बँक, मेटल, एनर्जी आणि एफएमसीजी ०.५-१ टक्क्यांनी वाढले.

हेवीवेट बँक स्टॉक्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) मधील १ ते २ टक्क्यांच्या वाढीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला. ऑटो, रियल्टी आणि हेल्थकेअर शेअर्समध्ये आज चौफेर खरेदी दिसून आली.

सेन्सेक्स आज ७१ हजारांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,८५१ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर सन फार्मा, टाटा मोटर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढले. त्याचबरोबर एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, पॉवर ग्रिड, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक हे सर्वाधिक वाढले. दरम्यान, एलटीचे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरून ३,४७८ रुपयांवर आला.

निफ्टीवर डॉ. रेड्डीज, आयशर मोटर्स, सन फार्मा, टाटा मोटर्स, डिव्हिज लॅब हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर एलटी, टायटन हे घसरले.

अंतरिम अर्थसंकल्प

उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने गुंतवणूकदार कमी अपेक्षेने याकडे पाहत आहेत. (Stock Market Closing Bell) पण तरीही बाजारात आज गुंतवणूकदारांचा उत्साह दिसून आला.

बँकिंग शेअर्स

या महिन्यात बँकिंग स्टॉकवर विक्रीचा दबाव राहिला. पण आता निफ्टी बँकेने रिकव्हरी केली. आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी बँक १.४ टक्क्यांनी वाढून ४६ हजारांवर पोहोचला. या महिन्यात बँकिंग निर्देशांक सुमारे ५ टक्क्यांनी खाली आला होता. एचडीएफसी बँकेच्या शेअर्सला अधिक फटका बसला होता. आज निफ्टी बँकमध्ये पीएनबी, बँक ऑ‍फ बडोदा, एसबीआय, बंधन बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक हे शेअर्स टॉप गेनर्स होते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news