Stock Market Closing Bell | नवव्या सत्रांतही सेन्सेक्स तेजीत! निफ्टी पहिल्यांदाच २० हजारांवर बंद, जाणून घ्या आज काय घडलं?

Stock Market Closing Bell | नवव्या सत्रांतही सेन्सेक्स तेजीत! निफ्टी पहिल्यांदाच २० हजारांवर बंद, जाणून घ्या आज काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजारात आज पुन्हा खरेदीचा मूड दिसून आला. सुरुवातीच्या घसरणीतून सावरत सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत व्यवहार केला. सेन्सेक्स २४५ अंकांनी वाढून ६७,४६६ वर बंद झाला. सेन्सेक्स सलग ९ व्या सत्रांत वाढला आहे. तर निफ्टी ७६ अंकांच्या वाढीसह २०,०७० वर बंद झाला. निफ्टी २० हजारांवर बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

क्षेत्रीय पातळीवर मेटल, ऑईल आणि गॅस प्रत्येकी १ टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक ४ टक्क्यांनी वाढले. तर कॅपिटल गुड्स, ऑटो आणि आयटी निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक घसरणीतून सावरत सपाट पातळीवर बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.८ टक्क्यांनी वाढला.

बाजारातील वाढीत पीएसयू बँकिंग स्टॉक्स आघाडीवर राहिले. PSU bank स्टॉक्स आजच्या ट्रेडिंग सत्रात ७ टक्क्यांपर्यंत वाढले. तर आयटी स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. (Stock Market Closing Bell) जागतिक कमकुवत संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात होत असलेला विक्रीचा मारा यामुळे सुरुवातीच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांकांत घसरण दिसून आली होती. पण त्यानंतर दोन्ही निर्देशांक सावरले आणि ते वधारुन बंद झाले.

सेन्सेक्स आज ६७,१८८ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६७,५६५ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर भारती एअरटेल, टायटन हे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. इंडसइंड बँक, एसबीआय, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, कोटक बँक, रिलायन्स हे शेअर्स १ टक्क्यांनी वाढले. तर एलटी, एम अँड एम हे शेअर्स १ टक्क्यांहून अधिक घसरले. मारुती, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून आली.

निफ्टी ५० वर कोल इंडिया, ग्रासीम, टाटा कंन्झूमर, भारती एअरटेल, टायटन हे शेअर्स वाढले. तर एचडीएफसी लाईफ, एलटी, एम अँड एम, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब हे शेअर्स घसरले. (Stock Market Closing Bell)

आशियाई बाजारात कमकुवत स्थिती

आशियातील सेऊल, शांघाय आणि हाँगकाँग येथील शेअर बाजारात कमकुवत स्थिती दिसून आली. तर टोकियोतील बाजारात तेजी राहिली. अमेरिकेतील शेअर बाजारातील निर्देशांक मंगळवारी नकारात्मक पातळीवर बंद झाले होते. दरम्यान, अमेरिकेतील महागाई नियंत्रणात राहण्यासाठी तारेवरची कसरत सुरु असून या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्ह काय भूमिका घेणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरुच

गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारात विक्री सुरुच आहे. एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FIIs) बुधवारी भांडवली बाजारात निव्वळ विक्रेते होते. कारण त्यांनी १,०४७.१९ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news