Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला, बाजारातील विक्रीमागे मॉरिशसचा काय संबंध?

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण झाली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स तब्बल ७९३ अंकांनी घसरून ७४,२४४ वर बंद झाला. तर निफ्टी २३४ अंकांनी घसरून २२,५१९ वर स्थिरावला. आज सर्व क्षेत्रात चौफेर विक्रीचा मारा दिसून आला. आजच्या विक्रीचा स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांना मोठा फटका बसला. (Stock Market Closing Bell)

अमेरिकेतील वाढत्या महागाईच्या दराने फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यती कमी झाली आहे. यामुळे गुंतवणुकदारांना आता त्यांचे लक्ष देशांतर्गत कार्पोरेट कंपन्यांच्या कमाईकडे वळवले आहेत. या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे १ टक्क्यांनी घसरले. सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज लाल रंगात रंगले. निफ्टी फार्मा, निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांकांना सर्वाधिक फटका बसला. बीएसई मिडकॅप ०.४ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप ०.६ टक्क्यांनी घसरला.

गुंतवणूकदारांना २.४२ लाख कोटींचा फटका

बाजारातील आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.४२ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ३९९.७७ लाख कोटींवर आले. बुधवारी १० एप्रिल रोजी बाजार भांडवल ४०२.१९ लाख कोटी होते. आज त्यात २.४२ लाख कोटी रुपयांची घट झाली.

'हे' शेअर्स घसरले

सेन्सेक्स आज ७४,८८९ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७४,३०० च्या खाली आला. सेन्सेक्सवर सन फार्माचा शेअर्स ४ टक्क्यांनी घसरून १,५३९ रुपयांवर बंद झाला. मारुतीचा शेअर्स ३ टक्क्यांनी घसरून १२,२७४ रुपयांवर आला. पॉवर ग्रिड, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एलटी, एसबीआय, एशियन पेंट्स, ॲक्सिस बँक, इन्फोसिस, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, विप्रो हे शेअर्सही १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर टाटा मोटर्स, टीसीएस शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली.

निफ्टीवर सन फार्मा, मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टायटन कंपनी आणि ओएनजीसी हे टॉप लूजर्स होते. तर डिव्हिस लॅब्स, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, बजाज ऑटो, टाटा मोटर्स आणि टीसीएस हे शेअर्स तेजीत राहिले.

FPIs कडून दबाव

सरकारने मॉरिशस मार्गे येणाऱ्या परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठी (FPIs) दिलेली कर सवलत संपवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि मॉरिशस दरम्यान गेल्या ७ मार्च रोजी एक टॅक्स समझोता करारावर (tax treaty) स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. पण याबाबतची माहिती पहिल्यांदा १० एप्रिल रोजी सार्वजनिक करण्यात आली. भारत – मॉरिशस कर करारातील दुरुस्तीमुळे मॉरिशसमार्गे येणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना छाननीला सामोरे जावे लागणार आहे. या दुरुस्तीनुसार एक प्रिन्सिपल परपज टेस्ट (PPT) लागू करण्यात आले आहे. करदात्यांकडून होणारा कर सवलतीचा दुरुपयोग रोखण्याच्या यामागील उद्देश आहे.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि हाय नेट वर्थ व्यक्ती (HNI) कर लाभांसाठी मॉरिशससारख्या काही देशांद्वारे भारतात गुंतवणूक करत आहेत. भारतात ज्या देशांतून परदेशी गुंतवणूक येते त्यात मॉरिशस चौथ्या स्थानी आहे. पण आता मॉरिशसच्या माध्यमातून येणाऱ्या गुंतवणुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत.

अमेरिकेतील महागाईत वाढ

अमेरिकेतील महागाईचा दर वाढतच चालला आहे. मार्चमधील अपेक्षेपेक्षा जास्त किरकोळ महागाईवाढीने जूनमधील संभाव्य व्याजदर कपातीची आशा मावळली आहे. यूएस कंझ्युमर प्राइस इंडेक्स (सीपीआय) मार्चमध्ये ०.४ टक्के वाढला. फेब्रुवारी प्रमाणेच मार्चमध्ये महागाई दराने वाढीची गती कायम ठेवली. गेल्या महिन्यात कन्झ्यूमर प्राइस इंडेक्स ०.४ टक्क्यांनी वाढला, असे अमेरिकेच्या कामगार विभागाच्या कामगार सांख्यिकी ब्यूरो (BLS) ने सांगितले. ही वाढ अपेक्षेपेक्षा अधिक राहिली आहे. (Stock Market Closing Bell)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news