राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
Published on
Updated on

मुंबई; दिलीप सपाटे : राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार डिसेंबरमध्ये नागपूर येथे होणार्‍या हिवाळी अधिवेशनापूर्वी करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी हा विस्तार लांबणीवर पडणार असल्याची चर्चा भाजप आणि शिंदे गटात सुरू झाली आहे. त्यामुळे विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या आमदारांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

सरकार स्थापनेनंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीच शपथ घेतली होती. त्यानंतर पहिल्या विस्तारात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी नऊ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यामुळे सध्या 20 जणांचे मंत्रिमंडळ राज्याचा गाडा हाकत आहे. जवळपास निम्म्या जागा रिक्त आहेत. नागपूर अधिवेशनापूर्वी या रिक्त जागा भरण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी दिले होते. मात्र, या विस्ताराबाबत भाजप आणि शिंदे गटात कोणतीही चर्चा झाली नाही. तशा कोणत्याही हालचालीही नाहीत. त्यामुळे हा विस्तार लांबणीवर पडतो की काय, अशी चर्चा भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्येही सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिरिक्त खात्यांचा मोठा भार आहे. त्यातच ठाकरे सरकारच्या काळात राज्यमंत्रिपद सोडून शिंदे गटात सामील झालेले माजी राज्यमंत्री बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची वर्णी अद्याप मंत्रिमंडळात लागलेली नाही. बच्चू कडू यांची नाराजी वारंवार समोर आली आहे. शिंदे गटातून आमदार संजय शिरसाट, किशोर पाटील, चिमणराव पाटील असे अनेक दावेदार मंत्रिपदावर आपली दावेदारी सांगत आहेत. भाजपमध्येही मंत्रिपदासाठी अनेक तगडे दावेदार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी डिसेंबरपासून सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचे संकेत दिले होते. मात्र विस्ताराबाबत भाजप श्रेष्ठी आणि एकनाथ शिंदे यांच्यात अद्याप चर्चेला तोंड फुटलेले नाही.

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने भाजप – शिंदे गटाचे सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य केले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंसोबत गेलेल्या सर्वच आमदारांची वर्णी लागणे कठीण आहे. ज्या इच्छुक आमदारांना मंत्रिपदे मिळणार नाहीत, ते कदाचित मूळ शिवसेनेत परत येतील. काही आमदार जरी माघारी फिरले तरी सरकार अडचणीत येईल, अशी आशा महाविकास आघाडीतील नेत्यांना आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदे हे सावध पावले टाकत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news