मराठा आंदोलनाचा धसका; नाशिक येथून मराठवाड्याकडे जाणा-या एसटी बस रद्द

मराठा आंदोलनाचा धसका; नाशिक येथून मराठवाड्याकडे जाणा-या एसटी बस रद्द

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; मराठा आंदोलनाचा नाशिक एसटी महामंडळाने चांगलाच धसका घेतला आहे. नाशिकहुन मराठवाड्याकडे जाणा-या बस या बंद करण्यात आल्या आहेत. सकाळपासून नाशिकहुन एकही बस छत्रपती संभाजी नगर आणि जालन्याकडे रवाना झालेली नाही. मराठवाड्यातूनही नाशिककडे महामंडळाची एकही बस आलेली नाह. अचानक बस बंद झाल्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. गावागावत राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. मराठा बांधवांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा देखील आज 6 वा दिवस आहे. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती देखील खालावते आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये प्रचंड रोष वाढतो आहे. याचाच एसटी महामंडळाने धसका घेतला असून एसटी महामंडळाने मराठवाड्याकडे जाणा-या सगळ्या बसेस रद्द केल्या आहेत. तसेच रोज ज्या बसेस मराठवाड्यातून नाशिककडे येतात त्यातली एकही बस नाशिकमध्ये आलेली नाही.

बससेवा कधी सुरळीत होणार याबाबत अधिका-यांकडे कोणतीही माहिती नाही. तसेच प्रवाशांना देखील याबाबत काही ठोस माहिती नाही. नाशिक डेपोतून 12 बस संभाजीनगरला जातात. संभाजीनगरहुन साधारणपणे 20 बस नाशिकला येतात, तर जालना वाशीम अशा इतर डेपोच्या 25 बसही आल्या नाहीत.

राज्यात ठिकठिकाणी हीच परिस्थिती

धुळे, पुणे, सोलापूर आगारातही हीच परिस्थिती असून मराठवाड्याकडे जाणा-या अनेक बसेस रद्द करण्यात आल्या आहे. हळुहळु सर्वच आगारातून मराठवाड्याकडे जाणा-या बसेस रद्द केल्या जात असल्याचे दिसते आहे. त्यामुळे राज्यभरातून मराठवाड्याकडे येणा-या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून, त्यांनी पर्याय मार्ग शोधावा लागतो आहे. दरम्यान राज्य सरकार आज यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याने, या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news