स्पेन हा जर्मनीनंतर जगातील असा दुसरा देश ठरला आहे की, त्याने पुरुष आणि महिला या दोन्ही फुटबॉल स्पर्धांचे विश्वविजेतेपद पटकावण्याची किमया करून दाखविली आहे. स्पेनने केवळ तिसर्याच प्रयत्नात हे अद्भुत यश मिळवले असले, तरी त्यासाठी त्यांना तीव्र संघर्ष करावा लागला आहे. स्पेनच्या प्रत्येक खेळाडूने जीव ओतून समर्पित भावनेने खेळ केला. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर त्यांची कामगिरी उंचावत गेली.
'अगर इरादे हो बुलंद तो मंझिले है आसान,' असे म्हटले जाते. स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने याचा विस्मयकारी प्रत्यय आणून देताना थेट विश्वचषकाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियातील सीडनी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम लढतीत स्पेनने तगड्या इंग्लंडला 1-0 अशा फरकाने झटका देऊन इतिहास रचला. त्यांचे हे पहिलेच जागतिक अजिंक्यपद. वास्तविक, या लढतीत इंग्लंडचे पारडे जड दिसत होते. मात्र, स्पेनने हिकमतीने खेळ करून इंग्लंडला एकही संधी दिली नाही. चिरेबंदी बचाव त्यांना विजयाकडे घेऊन गेला. त्यांच्या ओल्गा कार्मोनाने सामन्याच्या 29 व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. त्यानंतर स्पेनमध्ये जणू दिवाळीच साजरी करण्यात आली.
स्पेन आणि इंग्लंड हे दोन युरोपातील देश या स्पर्धेत पहिल्यांदाच आमने-सामने आले होते. अन्य स्पर्धांत इंग्लंड आणि स्पेन 13 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यातील केवळ दोन सामन्यांत इंग्लंडच्या वाट्याला पराभव आला होता. सांगण्याचा उद्देश असा की, इंग्लंडचा संघ स्पेनच्या तुलनेत किती तरी उजवा होता. तरीही स्पेनने त्यांना धूळ चारली. इंग्लंडच्या संघाने गेल्यावर्षी जर्मनीला नमवून युरो स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे विश्वचषक अजिंक्यपदासाठीही त्यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते. शिवाय, इंग्लंड संघाने या स्पर्धेच्या साखळी फेरीत तिन्ही लढतींमध्ये विजय मिळवून शानदार सुरुवात केली होती. अंतिम फेरीतही त्यांनी चिवट खेळ केला. तथापि, गोल करण्यात त्यांना शेवटपर्यंत यश आले नाही. अशा तर्हेने यंदा फिफा महिला विश्व फुटबॉल स्पर्धेला नवा विजेता मिळाला आहे. यापूर्वी अमेरिकेने चारवेळा, जर्मनीने दोनदा, नॉर्वे आणि जपान यांनी प्रत्येकी एकदा या झळाळत्या चषकावर आपले नाव कोरले आहे.
अनपेक्षित विजेता
या स्पर्धेत सुरुवातीपासून स्पेनने धडाका कायम राखला. मात्र, त्यांच्याकडे संभाव्य विजेता म्हणून कोणीही पाहायला तयार नव्हते. याचे कारण त्यांच्या आधीच्या कामगिरीत लपले आहे. हा संघ 1991, 1995, 1999, 2003, 2007 आणि 2011 च्या महिला फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रही ठरू शकला नव्हता. 2015 मध्ये प्रथमच, स्पॅनिश संघ महिला फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळला आणि त्यांनी तीनपैकी दोन सामने गमावले. तिसरा सामनाही अनिर्णीत राहिल्याने त्यांना गट पातळीवरच आपला गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर 2019 मध्ये स्पॅनिश संघाने चांगली कामगिरी बजावली. चार सामन्यांत एक विजय, दोन पराभव एक बरोबरी, अशी कामगिरी बजावल्यानंतर त्यांचे आव्हान आटोपले. यंदा त्यांनी 20 ऑगस्ट रोजी तब्बल 75 हजार 784 प्रेक्षकांच्या साक्षीने सीडनीत चमत्कार घडविला आणि झळाळत्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. कौतुकाची गोष्ट म्हणजे स्पेनच्या महिला संघाने यंदाच्या स्पर्धेत सातपैकी सहा सामने जिंकले आणि केवळ एक सामना गमावला. 1983 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कपिलदेवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे जसे 'अंडरडॉग्ज' म्हणून पाहिले जात होते, तसेच स्पेनच्या बाबतीत घडले. भारताने तेव्हा बलवान वेस्ट इंडिजचा फडशा पाडला, तर स्पेनच्या महिलांनी इंग्लंडला आस्मान दाखवले.
इतिहासावर एक नजर
स्पेनने केवळ तिसर्याच प्रयत्नात हे अद्भुत यश मिळवले असले, तरी त्यासाठी त्यांना तीव्र संघर्ष करावा लागला आहे. त्याची पाळेमुळे 1970 च्या दशकात दिसून येतात. त्या आद्य शिल्पकाराचे नाव राफेल मुगा. स्पेनमध्ये महिला फुटबॉल रुजवण्याचे संपूर्ण श्रेय निर्विवादपणे त्यांच्याकडेच जाते. 1970 मध्ये त्यांनी स्पेनचा महिला फुटबॉल संघ बांधायला सुरुवात केली. साहजिकच, तेव्हा अनेकांनी त्यांना वेड्यात काढले. एवढेच नव्हे, तर स्पेनच्या राजघराण्यानेही त्यांच्या या प्रयोगाबद्दल नाक मुरडले होते. दुसरे असे की, त्यावेळी अपार शारीरिक क्षमता आवश्यक असलेला हा वेगवान खेळ महिलांसाठी नाही यावर स्पेनमध्ये जवळपास एकमत झाले होते. मात्र, मुगा हार मानायला तयार नव्हते. त्यांनी बांधलेल्या महिला संघाला अधिकृतरीत्या मान्यता मिळाली नसली, तरी त्यांचे प्रयत्न सुरूच होते. अखेर जेव्हा या चमूतून एकापेक्षा एक सरस महिला खेळाडू प्रेक्षकांच्या नजरेस पडू लागल्यानंतर कुठे तरी चुळबुळ सुरू झाली. अखेर तब्बल दहा वर्षांनंतर म्हणजे 1980 मध्ये स्पेनमध्ये महिला संघाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्यात आली. त्यानंतर स्पेनच्या महिला फुटबॉलने कात टाकली. तिथल्या रणरागिणींनी विविध ठिकाणच्या युरोपियन लीग स्पर्धांत आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. पाठोपाठ महिलांच्या फुटबॉल सामन्यांना गर्दी होत गेली. पैसा, कीर्ती आणि सन्मान या गोष्टी महिला खेळाडूंनाही मिळू लागल्या.
सुयोग्य आखणी, प्रभावी कार्यवाही
स्पेन हा जर्मनीनंतर जगातील असा दुसरा देश ठरला आहे की, त्याने पुरुष आणि महिला या दोन्ही फुटबॉल स्पर्धांचे विश्वविजेतेपद पटकावण्याची किमया करून दाखविली आहे. स्पनेच्या महिला संघाचे प्रशिक्षक जॉर्ज विलदा यांचा या विजयात मोलाचा वाटा आहे, हे मान्य केले पाहिजे. त्यांनी प्रत्येक सामन्यासाठी वेगळी व्यूहरचना केली. प्रतिस्पर्धी संघांचे कच्चे दुवे ओळखून त्यानुसार आपल्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेतली. अर्थात, युक्तीच्या चार गोष्टी प्रशिक्षकाने सांगितल्या, तरी प्रत्यक्ष मैदानावर त्या कितपत उतरवल्या गेल्या यालाच सर्वाधिक महत्त्व असते. स्पेनच्या प्रत्येक खेळाडूने जीव ओतून समर्पित भावनेने खेळ केला. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर त्यांची कामगिरी उंचावत गेली. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत तर त्यांनी कळस गाठला आणि विश्वचषक स्पेनच्या अंगणात येऊन विसावला.
स्पर्धेला विक्रमी प्रतिसाद
या स्पर्धेचे यजमानपद ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांनी संयुक्तपणे भूषवले. महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आणि 57 कोटी डॉलरपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. मात्र, येथेही पुरुष-महिला हा वाद बोकाळला आहेच. महिला विश्वविजेत्यांना समान बक्षीस रक्कम असणार नाही, असे 'फिफा'चे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांनी स्पर्धेनंतर लगेच स्पष्ट केले. 'फिफा'च्या सध्याच्या रचनेनुसार पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेतील विजेत्याला 44 कोटी डॉलर देण्यात येतात, तर महिला स्पर्धेतील विजेत्याला केवळ 11 कोटी डॉलर दिले जातात. महिलांनाही पुरुषांएवढी समान बक्षीस रक्कम देण्याची मागणी समोर येऊ लागली आहे; पण हे सध्या तरी शक्य नसल्याचे 'फिफा'ने म्हटले आहे. महिलांची विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करण्यासाठी होणारा खर्च त्यातून मिळणार्या उत्पन्नाच्या रकमेपेक्षा जास्त असतो. त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला अनुदान देऊन स्पर्धा खेळवावी लागते. परिणामी, समान बक्षीस रक्कम देता येणार नाही, असे 'फिफा'चे म्हणणे आहे. वास्तविक, 57 कोटी डॉलरची कमाई झाल्यानंतर 'फिफा'ने महिला विश्वविजेत्यांना आणखी मोठे बक्षीस द्यायला हवे, यात शंका नाही. या स्पर्धेत स्वीडनला तिसरा, तर यजमान ऑस्ट्रेलियाला चौथा क्रमांक मिळाला. 1991 मध्ये महिलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली, तेव्हा पहिले यजमानपद चीनने भूषविले. अमेरिकेने अंतिम लढतीत तेव्हा नॉर्वेला 2-1 अशा फरकाने पराभूत केले होते. दखलपात्र बाब म्हणजे, आतापर्यंतच्या नऊ स्पर्धांत स्पेनला चौथा क्रमांकसुद्धा मिळाला नव्हता. यावेळी त्यांनी कमालच केली.
जबरदस्तीने किस; वादाचे मोहोळ
एकीकडे स्पेनच्या महिला संघाने विश्वविजेतेपद जिंकलेले असताना, विजयापेक्षा वादच जास्त रंगल्याचे दिसून आले. स्पेनची आघाडीपटू जेनी हर्मोसो हिला स्पॅनिश फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष लुईस रुबियल्स यांनी सेलिब्रेशन करताना किस केल्याने वाद रंगला. पाठोपाठ तसाच आणखी एक व्हिडीओ समोर आला. यात संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉर्ज विलदा महिला कर्मचार्याच्या छातीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहेत.
ओल्गाने अंतिम सामन्यात महत्त्वाचा गोल लगावल्यानंतर आनंद व्यक्त केला जात असताना हा विचित्र प्रकार घडला. स्पेनच्या महिला संघाने गेल्या काही वर्षांमध्ये यशस्वी कामगिरी केली असून, यात जॉर्ज यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, त्यांच्याकडून असा प्रमाद घडणे अपेक्षित नाही. स्पेनच्या चाहत्यांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. रुबियल्स यांनी तर जॉर्ज यांच्यावरही कडी केली. सामना जिंकल्यानंतर खेळाडू मंचावर पदके स्वीकारण्यासाठी पुढे जात असताना रुबियल्स हेही खेळाडूंच्या अभिनंदनासाठी तिथे उभे होते. यादरम्यान ते प्रत्येक महिला खेळाडूला मिठी मारत आणि तिच्या गालावर आपले ओठ उमटवत होते. यादरम्यान महिला खेळाडूही ओशाळल्यासारख्या दिसत होत्या. स्टार खेळाडू हर्मोसो आली असता रुबियल्स यांनी तिलाही मिठी मारली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट तिला तीनवेळा किस केले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच रुबियल्स यांच्यावर कडाडून टीका झाली. स्पेनमध्ये संतापाची लाटच पसरली. पाठोपाठ स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सँचेझ यांनी तर या प्रकारामुळे देशाच्या प्रतिष्ठेचा फालुदा झाल्याची कडक प्रतिक्रिया व्यक्त केली.
या काही गोष्टी सोडल्या, तर ही स्पर्धा सर्वाधिक यशस्वी ठरली, असेच म्हटले पाहिजे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडबरोबरच अन्य देशांतील प्रेक्षकांनीही जवळपास सर्वच सामन्यांना आवर्जून हजेरी लावली. मुख्य म्हणजे, सगळे संघ अटी-तटीने खेळले. त्यामुळे उत्तरोत्तर महिला फुटबॉललाही जागतिक पातळीवर चांगले दिवस येऊ लागल्याचे सुखद चित्र समोर आले आले आहे. जिगरबाज स्पेनने यंदाच्या स्पर्धेवर ठसा उमटवला, हे खरेच.
विजयाला दुःखाची किनार
स्पेनच्या विजयात ओल्गाने सिंहाचा वाटा उचलला खरा; पण सामन्यानंतर तिला कळले की, तिचे वडील हे जग सोडून गेले आहेत. ते आजारी होते. लाडक्या लेकीचा खेळ डोळ्यांत प्राण आणून पाहत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकीकडे विश्वचषक जिंकल्याचा आनंद, तर दुसरीकडे पित्याचे छत्र हरपल्याचे दुःख. तरीही ओल्गाने ओठांतच आपले वैयक्तिक दुःख दाबून ठेवले आणि मंद स्मित करत विश्वचषक उंचावला. 'पप्पा, तुम्ही माझ्यासाठी सारे काही होता. तुमच्यामुळेच मी इथवर मजल मारली. आज स्पेन विश्वविजेता झाला आहे. मात्र, ही आनंदयात्रा पाहण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत नाही. मला तुमची कन्या होण्याचा गर्व वाटतो. तुमच्या आत्म्याला शांती लाभो,' असे ट्विट तिने नंतर केले. विशेष गोष्ट अशी म्हणजे, ओल्गाने स्पेनसाठी 17 वर्षांखाली आणि 20 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धाही जिंकली आहे. पाठोपाठ तिने वरिष्ठ स्तरावरील विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला.