पुणे: जन्मदात्या आईलाच मुलांकडून 46 लाखांचा गंडा, 82 वर्षाच्या आईच्या नकळत सह्या घेऊन केली फसवणूक

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कधीही विचारपूस न करणारा मुलगा आणि सून यांनी आपल्या आईला माहेरहून पैसे मिळणार आहेत, हे समजताच तिच्याकडे येऊन न्यायालयाच्या कामाकरीता सह्या लागतात, असे खोटे सांगत बँक खात्यातून 46 लाख रुपये परस्पर काढून घेतले. त्यानंतर 82 वर्षाच्या जन्मदात्या आईचे पाणी व लाईट बंद करुन तिचा सांभाळ करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिच्या पोटच्या दोन मुलांसह सुना आणि एका नातीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मुंढवा येथील एका 82 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाळासाहेब मारूती टिळेकर, मिलिंद मारूती टिळेकर, सुनिता बाळासाहेब टिळेकर, स्वाती बाळासाहेब टिळेकर, स्वाती मिलिंद टिळेकर आणि नात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 16 एप्रिल 2012 ते 5 डिसेबर 2022 दरम्यान घडला आहे. फिर्यादी यांच्यावतीने अ‍ॅड. स्मिता पाडोळे काम पाहत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही 82 वर्षाची आहे. त्या केशवनगर येथील एका वाड्यात एकट्याच राहण्यास आहेत. त्यांना चार मुले आहेत. त्यांचा सर्वात मोठा मुलगा बाळासाहेब, दुसरा सुनिल, तिसरा मिलिंद तर लहान मुलगा चंद्रशेखर आहे. त्या सुरुवातीला लहान मुलाकडे राहण्यास होत्या. त्यावेळी इतर मुले त्यांची साधी विचारपूस करत नव्हते. परंतु जेव्हा त्यांना आईला माहेरकडून पैसे मिळाणार आहेत हे समजल्यानंतर त्यांच्या आईकडे चकरा वाढू लागल्या. तिच्या विषयी त्यांच्या मनात प्रेम निर्माण झाले. आई देखील त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलू लागले. मोठ्या मुलाने तिला माझे घर रिकामे पडले आहे, ते घर तुला देतो. तिथे कायमची राहा, मी ते घर तुझ्या नावावर करतो असे म्हणाला. त्यानंतर त्यांच्याकडे आई बारा वर्ष राहत होती. एप्रिल 2012 मध्ये कोर्टाच्या आदेशाने आईच्या खात्यात वडीलांच्या मिळकतीचे 60 लाख रूपये वर्ग झाले. त्यानंतर 16 एप्रिल 2012 रोजी कोर्टाबाहेर आल्यावर मुलांनी आईच्या कोर्टाच्या कामानिमित्त कागदावर सह्या घेतल्या.

त्यानंतर फिर्यादीने त्या पैशाकडे पाहिले नाही. परंतु 2015 मध्ये त्यांना अ‍ॅटॅक आला. त्यासाठी अडीच लाख रूपये भरण्यासाठी बँक खात्याचा धनादेश दिला, तेव्हा त्यांना त्यांच्या खात्यातून कोणीतरी 46 लाख काढले असे समजले. त्यांना मुलांनीच ते पैसे काढल्याचे तिला समजले. तेव्हा फिर्यादीने पैसे परत मागितले असता त्यांनी तिला तुला काय करायचे ते कर, तुला पैसे परत मिळणार नाही असे सुनावले. दर महिन्याला लाईट बिलाचे 500 रूपये देऊनही ते मुलाने भरले नसल्याने वीज वितरण कंपनीने आई राहत असलेल्या घरातील मिटर काढून नेला. पाणी पट्टी न भरल्याने पाणीही बंद केले. तसेच आई निघून जावी, यासाठी वरच्या मजल्यावर पत्र्याच्या घरात राहण्यास सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तिने घरातून निघुन जावे, यासाठी कोर्टात दावा देखील दाखल केला. जो पर्यंत पैसे परत देणार नाही, तोपर्यंत घर सोडणार नसल्याचा पवित्रा फिर्यादीने घेतला. या दरम्यान त्यांनी पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडे तक्रार दिली. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण गुन्हे दाखल करण्यासाठी मुंढवा पोलिसांकडे पाठविले. या प्रकरणात आता मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भरोसा सेलच्या ज्येष्ठ नागरिक विभागाच्या अभिप्रायानंतर हा गुन्हा आमच्या पोलिस ठाण्यात दाखल होण्यासाठी आला आहे. दहा वर्षापूर्वी पासूनचा घडत आलेला हा गुन्हा आहे. त्यानुसार संबंधीत मुलांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमचा पुढील तपास सुरू आहे.
– अजित लकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news