भोपाळ : एरवी भारतात जावयाला देवासमान दर्जा असतो, असेच चित्र आहे. अधिक मासात वाण देण्यासाठी जावयांची कशी सरबराई झाली, ते उदाहरण अतिशय ताजे आहे. पण, याच भारतात एक समुदाय असाही आहे, ज्यात जावयाला चक्क नोकराप्रमाणे वागवले जाते आणि इतकेच नव्हे, तर त्यांच्याकडून शेताची कामे करवून घेतली जातात आणि प्रसंगी प्राण्यांचे रक्तही पिण्यास दिले जाते!
एरवी भारतात, विवाहसोहळेही अगदी थाटामाटात होतात. आपल्या आयुष्याची कमाई, सर्वस्व पणाला लावत मुलीचा विवाह सोहळा आयोजित केला जातो. जावई कसाही असला तरी सासरी पूर्ण सन्मान दिला जातो. पण, मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन राज्यांत 'गोंड' हा एक असा समुदाय आहे, जेथे जावई हा अगदी नोकरासमान असतो.
सध्या सारी जगरहाटी बदलली आहे. पण, या समुदायाने मात्र आपली पूर्वापार परंपरा अजिबात खंडित होऊ दिलेली नाही. या समुदायात विवाहाच्या प्रथा देखील जुन्यापुराण्याच आहेत. या समुदायातील एक जुनी प्रथा फक्त प्रेमविवाहापुरती मर्यादित आहे. यानुसार, प्रेमविवाह करायचा असेल तर त्या मुलाला सासर्याच्या शेतात मेहनत करावी लागते. सासर्याची खात्री पटली, तरच तो विवाह होतो. इतकेच नव्हे तर आपल्या पत्नीसाठी आपण काहीही करू शकतो, हे दाखवून देण्यासाठी नियोजित वराला काहीही दिव्ये पार पाडावी लागू शकतात.
गोंड समुदायातील लोक बर्याचदा शिकारीवर अवलंबून असतात. त्यांच्या आहारात मासे, मांस याचाच अधिक समावेश असतो. सारी मानवजाती सुधारली असताना या समुदायातील या जुन्यापुराण्या प्रथा मात्र आजही 'जैसे थे' चालत आल्या आहेत, हे आश्चर्यकारक आहे.