सांगोला; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात कारणावरून वासूद (ता. सांगोला) येथील सूरज विष्णू चंदनशिवे (वय 42) या निलंबित सहायक पोलिस निरीक्षकाचा डोक्यात व पाठीवर धारदार शस्त्राने वार करून बुधवारी रात्री उशिरा खून केल्याची घटना समोर आली आहे. खुनाच्या तपासासाठी सांगोला पोलिसांनी चंदनशिवे यांचे जुने मित्र असलेल्या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास सांगली व कोल्हापूर येथील स्थानिक पोलिस यंत्रणा करत आहे. दरम्यान, यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हाही दाखल झालेला नाही. खुनाचे कारणही समजू शकले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सूरज चंदनशिवे हे वासूद गावचे रहिवासी असून वारणानगर (ता. पन्हाळा) येथील नऊ कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणातील संशयित आहेत. याच प्रकरणात सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातून त्यांना निलंबित केले होते. ते सध्या सांगली येथील पोलिस ठाण्यात रोज वासूद येथून जात होते. त्यांनी सध्या कासेगाव (ता. पंढरपूर) येथे दूध संकलनाचा प्रकल्पही सुरू केला आहे.
सूरज चंदनशिवे रोज वासूद येथे मुक्कामी असत. रात्री जेवण झाल्यावर केदारवाडी रस्त्याने ते चालत निघाले होते. रात्री 11 च्या सुमारास ते केदारवाडी रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत बसले होते. यावेळी त्यांनी कानात हेडफोन घातला होता. त्याचवेळी अज्ञात व्यक्तींनी मागून येऊन त्यांच्या डोक्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार केले. तशा खुणा त्यांच्या मृतदेहावर दिसून आल्या. खून केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांचा मृतदेह ओढत नेऊन उसाच्या शेतात पालथा टाकला. उसाच्या त्या शेतात पाणी असल्याने त्या चिखलात त्यांचे तोंड बुडवल्याचे दिसत होते, तर रस्त्यावरून उसापर्यंत फरपटत आणल्याने रक्तही सांडलेल्याच्या खुणा दिसून आल्या.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सूरज हे घरी परतले नाहीत म्हणून नातेवाईकांनी गुरुवारी सकाळी शोध घेतला. तेव्हा वासूद-केदारवाडी रस्त्यानजीक त्यांचा मृतदेह आढळला. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवला. सुरज यांचे बंधू सुनील हे मंत्रालयात कर्मचारी आहेत. ते सांगोला येथे दुपारी तीन वाजता आले. त्यांनी पोलिस अधिकार्यांशी चर्चा केली. सायंकाळी साडेपाचपर्यंत सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते. त्याचे चित्रीकरणही करण्यात आले आहे.