पुढारी ऑनलाईन डेस्क
अतिशय खडतर आणि प्रेरणादायी आयुष्य जगणार्या अनाथांची आई म्हणजे सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. सिंधूताईंच्या जाण्याने त्यांनी सांभाळ केलेली हजारो मुलं अनाथ झाली आहेत. अतिशय खडतर आणि प्रेरणादायी आयुष्य जगणार्या या माऊलींच्या मृत्यूची बातमी कळताच महाराष्ट्राचे समाजमानस हादरून गेले. हजारो अनाथांच्या डोक्यावरील मायेची सावली हरपल्याच्या भावना समाजातील सर्व स्तरांतून व्यक्त झाल्या.
सामाजिक कार्यासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. सिंधुताईंचा आयुष्याचा खडतर प्रवास खूपच संघर्षमय होता. त्यांनी अनेक कार्यक्रम, मुलाखतीत आपल्या जीवनाच्या संघर्षाची कहाणी कथन केली होती. एका मुलाखतीत त्यांनी, अशी वेळ होती की चितेवर पीठ मळून चक्क चितेवर भाकरी भाजून खाल्ल्याचा अनुभव सांगितला होता. बाईसाठी सुरक्षित जागा स्मशानच…, असे सिंधुताईंनी परखड मत मांडलं होतं.
बेघर झाल्यानंतर सिंधुताई (Sindhutai Sapkal) स्मशानात राहिल्या. पण पुढे त्यांनी हिमतीने उभे राहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जीवनावर 'मी सिंधुताई सपकाळ' हा चित्रपट बनवण्यात आला. या चित्रपटाचा लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला होता. तसेच गोव्यात २०१० मधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागाची सुरुवात या चित्रपटाने झाली होती. यावेळी स्वतः सिंधुताई हजर होत्या. त्यावेळी सिंधुताईंनी केलेल्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. त्या म्हणाल्या होत्या, "चित्रपटाने माझा जीवनप्रवास ज्या प्रकारे चित्रित केला आहे त्याबद्दल मी समाधानी आहे. मी चित्रपटातून माझा भूतकाळ पाहत आहे." त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, या चित्रपटाने माझ्या आयुष्याचे सार टिपले आहे. यावेळी सिंधुताईंच्या भाषणाने आयनॉक्स मल्टिप्लेक्स टाळ्यांच्या कडकडात दणाणून गेले होते. देश-विदेशातील सिनेसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, प्रेक्षक आणि मान्यवरांनी उभे राहून त्यांचे स्वागत (Standing ovation) केले होते.
सिंधुताईंना लोक प्रेमाने माई म्हणत. माई मूळच्या विदर्भातल्या. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बालसदन संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली.
आपली मुलगी ममता यांना दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक- युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे 1050 मुले या संस्थेत राहिलेली आहेत.
वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे सांभाळण्याचे काम करायचे. नवरगाव हे अतिशय मागासलेले, शहरी सुविधांचा स्पर्श नसलेले, कुणालाही शिक्षणाचा गंध नसलेले गाव, अशा परिस्थितीत अभिमान साठे पिंपरी गावात आले. चिंधी म्हणजेच सिंधुताई ही त्यांची सर्वांत मोठी मुलगी. सिंधुताईंना एक भाऊ आणि एक बहीण आहे. मुलीने शिकावे अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती; पण आईचा मात्र सक्त विरोध होता म्हणून माईंना गुरे राखायला पाठवले जात असे. काही दिवसांनी अल्पवयातच सिंधुताईंचे लग्न झाले. स्वत:च्या संसाराची पर्वा न करता सिंधुताई अनाथांची आई झाल्या आणि आयुष्यभर त्या या मुलांसाठी झिजत राहिल्या.
हे ही वाचा :