कोकणातून ‘व्हेल’च्या उलटीची तस्करी!

कोकणातून ‘व्हेल’च्या उलटीची तस्करी!

सांगली : कोकणातील समुद्र किनारपट्टीवरून 'व्हेल' माशाच्या उलटीची तस्करी केली जात आहे. विशेषत: 'परफ्युम' बनविणार्‍या कंपन्यांकडून या उलटीला मागणी असल्याने किलोच्या उलटीला सुमारे एक कोटीचा भाव मिळत आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई व ठाणे जिल्ह्यातील तस्कर मच्छीमारांच्या संपर्कात आहेत.

इस्लामपुरात दोन दिवसापूर्वी व्हेल माशाची उलटी जप्त केली. सहा महिन्यांपूर्वी सांगलीतही तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला होता. पण मुळापर्यंत जाऊन तपास न झाल्याने आजही जिल्ह्यात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी सुरूच आहे.

'परफ्युम' टिकतो दीर्घकाळ!

समुद्राच्या खार्‍या पाण्यामुळे व सूर्यकिरणांमुळे व्हेलची उलटी चिकट बनते. ती मेणासारखी दिसते. तिचे वजन 15 ग्रॅमपासून ते शंभर किलोपर्यंत असू शकते. व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडणार्‍या उलटीला दुर्गंधी येते. मात्र या उलटीचा वापर 'परफ्युम' तयार करण्यासाठी होतो. 'परफ्युम'ची निर्मिती करणार्‍या कंपन्या उलटीचा वापर करतात. 'परफ्युम' शरीराला लावण्यासाठी वापतात. या उलटीतील घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे 'परफ्युम' दीर्घकाळ टिकतात. 'परफ्युम' तयार करणार्‍या कंपन्या व्हेलच्या उलटीसाठी प्रचंड रक्कम मोजतात.

'तरंगतं' सोनंच…

व्हेलच्या उलटीचा वापर सुगंधित धूप व अगरबत्तीमध्येही होतो. एम्बरग्रीसचा तुकडा सोबत ठेवल्यास प्लेग रोखण्यास मदत होते, असे युरोपियन लोक मानतात. औषधांमध्येही व्हेलच्या माशाच्या उलटीचा वापर केला जातो. दारू, सिगारेट बनविण्यासाठीही उपयोग केला जातो. सेक्सशी संबंधित आजारांवरील उपचारांतही वापर करण्यात येत असल्याने व्हेलच्या उलटीला बाजारात कोटीचा भाव मिळतो. व्हेल मासे समुद्रकिनार्‍यापासून फार लांब असतात. त्यांची उलटी किनार्‍यावर येण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. व्हेल माशाच्या उलटीला असलेली किंमत खूप असल्याने तिला 'तरंगतं सोनं' असंही म्हटलं जातं.

मेणासारखी उलटी

व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असतो. तो ज्वलनशील पदार्थ मानला जातो. म्हाकुळ नावाचा मासा हे व्हेलचे आवडते खाद्य आहे. म्हाकुळच्या तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचत नाही. तसेच व्हेल कोळंबीही खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायने असतात. उलटी लाटांवर तरंगत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते. ही उलटी मेणासारखी बनते.

तस्करांचं होतय सोनं!

व्हेल माशाची उलटी प्रथम मच्छीमारांना दिसून येते. उलटी नजरेस पडली की, मच्छीमारांबरोबर त्याची तस्करी करणार्‍या तस्करांचं मग सोनंच होतं. वन्य जीवन रक्षण कायद्यांतर्गत त्याची तस्करी करणे हा गुन्हा आहे. पण तरीही त्याची अत्यंत सावध पवित्रा घेऊन तस्करी केली जात आहे. सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई व ठाणे जिल्ह्यातील तस्कर मच्छीमारांच्या संपर्कात असतात.

उलटीचा कोट्यवधीचा भाव

व्हेल माशाच्या उलटीला शास्त्रीय भाषेत एम्बरग्रीस म्हणतात. व्हेलच्या आतड्यांपासून एम्बरग्रीस बाहेर पडते. व्हेल मासा समुद्रात अनेक
प्रकारचं अन्न खातो. काहीवेळा त्याला एखाद्या प्रकारचं अन्न पचत नाही; तेव्हा तो उलटी करतो. बाजारात या उलटीला कोटीचा भाव
मिळतो. त्यामुळेच तिची तस्करी वाढली आहे. पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण व कोल्हापुरात सातत्याने व्हेल माशाची उलटी जप्त करण्याची कारवाई झालेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news