लंडन : सध्याचा जमाना वेअरेबल गॅझेटचा म्हणजेच शरीरावर परिधान करता येण्यासारख्या अद्ययावत उपकरणांचा आहे. त्यामध्ये स्मार्ट बँड, स्मार्ट रिंग आणि स्मार्ट वॉचचाही समावेश होतो. आता ब्रिटनमध्ये एका कंपनीच्या सीईओला हार्ट अॅटॅक आला असता त्याचे प्राण अशाच स्मार्ट वॉचमुळे वाचल्याची घटना घडली आहे.
खासगी कंपनी हॉकी वेल्सचे सीईओ पॉल वॅपफॅम हे ब्रिटनमधील स्वानसी येथील मॉरिस्टन परिसरात सकाळी फिरण्यासाठी गेले होते. अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. पॉलने लगेचच त्यांच्या स्मार्टवॉचद्वारे पत्नीशी संपर्क साधला. त्यांची पत्नी घटनास्थळी पोहोचली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तातडीने त्यांना उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. पॉलने सांगितले की ते घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर होते, तेव्हा त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या.
वेदना इतकी तीव्र होती की, पॉल रस्त्यावर गुडघे टेकून बसले. पॉलने ताबडतोब त्यांच्या स्मार्टवॉचद्वारे पत्नी लॉराशी संपर्क साधला. पत्नीने त्यांना तातडीने रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवले. स्मार्टवॉचमुळे प्राण वाचल्याची प्रकरणे यापूर्वीही अनेक वेळा समोर आली आहेत.