तंत्रज्ञान : संकट दाराशी; पण…

तंत्रज्ञान : संकट दाराशी; पण…

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येणार्‍या काळात नोकर्‍यांवर गदा येण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालातून समोर आले आहे. आरोग्य, बँकिंग, ई-कॉमर्ससारख्या अनेक क्षेत्रांत 'एआय'चा वापर हा निश्चितपणे वाढणार आहे. त्याच्यावर देखरेख वाढविण्याचीही गरज भासणार आहे.

आपला रोजगार हिरावून घेणारे, संकटाची व्याप्ती वाढविणारे, त्याचबरोबर उत्पादन क्षमता, जागतिक विकास आणि उत्पन्न वाढविणारे तंत्रज्ञान आपल्या दाराशी येऊन थांबले आहे. हे विश्लेषण एखाद्या व्यक्तीचे नसून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आहे. त्यामुळे जगभरात या तंत्रज्ञानाविषयी चिंता वाढली आहे. या अहवालानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगभरातील सुमारे 40 टक्के रोजगारांवर परिणाम होऊ शकतो. त्याचवेळी विकसित देशांत हीच आकडेवारी 60 टक्क्यांपर्यंत असू शकते. अशावेळी असमानतेत वाढ होणार हे निश्चितच. प्रश्न असा की, आगामी काळ एवढा भयावह असेल का?

आपण त्याची चर्चा नंतर करू. सुरुवातीला या अहवालातील सत्य शोधण्याचा प्रयत्न करू. महत्त्वाची अडचण म्हणजे या अहवालाचा आधार काय? कोणाच्या आधारावर अहवाल तयार केला गेला किंवा त्यासाठीचे कोणते गणित केले गेले? अर्थात ही बाब स्पष्ट होत नाही. यात पारदर्शकतेचा अभाव दिसतो. म्हणूनच अशा प्रकारच्या निष्कर्षावर पूर्णपणे विश्वास ठेवला जात नाही. नाणेनिधीकडून 40 टक्के रोजगारांवर गंडांतर येण्याचा मुद्दा समोर केला जात आहे. पण हे खरे असेल तर जगभरात मोठी अनागोंदी माजेल. पण कोणत्याही नव्या तंत्रज्ञानामुळे समाजात अराजकता निर्माण होईल, असे वाटत नाही. अर्थात 20 ते 25 टक्के नोकर्‍यांवर परिणाम होऊ शकतो, असे जरी गृहीत धरले तरी त्याचवेळी लोकांना अन्य पर्यायदेखील उपलब्ध होतील, हेदेखील पाहिले पाहिजे.

'एआय' आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आणि हे खरे आहे. आपण त्यापासून पळून जाऊ शकत नाही. त्याचा प्रभाव मानवावर, समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर देखील होणार आहे. परंतु बहुतांश परिणाम हे सकारात्मकच असतील. म्हणून नकारात्मकतेचा अधिक विचार करणे याठिकाणी सयुक्तिक वाटत नाही. 'एआय'मार्फत अनेक काम मार्गी लागत असताना काही गोष्टींसाठी मानवी प्रयत्नांचीच गरज भासणार आहे. 'एआय'साठी अशा गोष्टी अडचणींच्या असतील, तेथे मानवी हात, मेंदू, विश्लेषण आणि व्याख्येची गरज असेल. 'एआय'ला मानवी मेंदूनेच जन्माला घातले आहे. अशा स्थितीत 'एआय' हा मानवावर वरचढ ठरेल, या तर्कात फारसे तथ्य वाटत नाही. अर्थात त्याचा वापर केल्याने आपले जीवन अधिक सुसह्य होऊ शकते, हे मात्र निश्चित.

'एआय'मुळे लहानसहान नोकर्‍यांना धोका निर्माण होऊ शकतो. अशा नोकर्‍या की ज्या ठिकाणी अधिक विश्लेषणाची गरज भासत नाही. एकंदरीतच अशा प्रकारच्या कामांना 'एआय'मुळे धोका राहू शकतो. परंतु कायदा क्षेत्रात 'पॅरालिगल' म्हणजेच सहायकांना धोका राहू शकतो. किरकोळ संशोधन करणार्‍या मंडळींनादेखील अडचण येऊ शकते. अकाऊंटिंंग किंवा डेटा एंट्री करणार्‍या लोकांना देखील 'एआय'मुळे अडचण येऊ शकते. हे तर एआयचे प्रारंभिक रूप आहे. जसजसा त्यात विकास होईल, तसतसा त्याचा धोकादेखील वाढत जाईल. अशा स्थितीतही ज्या ठिकाणी मानवी हाताची आणि मेंदूची निकड असते तेथे संधी राहू शकते.

'एआय'मुळे नोकर्‍या गमावत असू तर नवीन रोजगाराच्या संधीदेखील निर्माण होतील. याप्रमाणे प्रॉम्प्ट कमांड इंजिनिअरला मागणी वाढू शकते. सर्व प्रश्नांना अचूक उत्तर देणारे किंवा योग्य संशोधन करणारे जनरेटिव्ह 'एआय' किंवा अल्गोरिदम तयार करणे. यासाठी प्रॉम्प्ट कमांड इंजिनिअर काम करत असतात. विकसित एआयचा सदुपयोग कशारीतीने करता येईल, त्याची मर्यादा कशी राहू शकते किंवा मानवी जीवनासाठी ते धोकादायक ठरणार नाही या अनुषंगानेदेखील नवीन रोजगार निर्माण होतील. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, 'एआय'ला मॉनिटरिंग करण्यासाठी माणसांचीच गरज भासणार आहे.

याशिवाय 'एआय'ला नियमबद्ध म्हणजेच रेग्युलेट करण्याचे काम माणसांकडूनच केले जाणार आहे. यासाठी आपल्याला कोणते कायदे असावेत यासाठीदेखील विश्लेषकांची गरज भासणार आहे. आरोग्य, बँकिंग, ई-कॉमर्स यांसारख्या अनेक क्षेत्रांत 'एआय'चा वापर हा निश्चितपणे वाढणार आहे. त्याच्यावर देखरेख वाढविण्याचीदेखील गरज भासणार आहे. 'एआय'वर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवू शकत नाही. पण आपण त्याच्यासमवेत वाटचाल केली तर ती कृती चांगलीच असेल. आपल्या अंगी संभाव्य संकटाचा आणि नुकसानीचा सामना करण्याचे सामर्थ्य आहे, म्हणूनच हे तंत्रज्ञान विकसित केले. त्यामुळे 'एआय'मुळे होणार्‍या नुकसानीची भरपाई चांगल्या रीतीने करू शकू.

भारताचा विचार केला तर 'एआय'चा अधिकाधिक वापर हा संघटित क्षेत्रात होईल. यानुसार 'एआय'वर कनिष्ठ पातळीवरच्या कामाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. अर्थात कोणत्या क्षेत्रात किती उच्च दर्जाचे 'एआय' वापरले जाते, यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. काही नुकसान असंघटित क्षेत्राचे देखील होऊ शकते. प्रामुख्याने लहान लहान कंपन्यांत 'एआय'चा वापर वाढू शकतो. आपली अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने असंघटित क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याकडील रोजगारावर परिणाम हेाणार नाही, असे म्हणणे चुकीचे वाटत नाही. म्हणून ज्या लोकांना त्याचा धोका वाटतो, त्यांनी कंबर कसली आहे. बदलत्या काळानुसार त्यांनी स्वत:ला तयार केले पाहिजे आणि तसे ते प्रयत्न करू शकतात. आधुनिक तंत्रज्ञान हा आपला चांगला साथीदार राहू शकतो आणि त्या बळावर अनेक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सक्षम राहू शकू. या स्थितीत सरकारच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. लोकांवर 'एआय'चा कितपत परिणाम होऊ शकतो, यासाठी जनजागृती अभियान राबविणे गरजेचे आहे.

'एआय'संदर्भात कायदेशीर तरतुदी कराव्या लागतील. सध्या अशा कायद्याचा अभाव दिसतो. साहजिकच या गोष्टी सरकार एकट्याने करू शकत नाही. खासगी क्षेत्रानेदेखील पुढे येणे गरजेचे आहे. सार्वजनिक आणि खासगी सहभागातून 'एआय'ची आव्हाने, त्याचे नफा-नुकसान आणि त्याविरुद्ध स्वत:ला सक्षम तयार करण्याच्या तयारीवरून लोकांत जागरुकता निर्माण करू शकतो. अर्थात आपल्याकडे डिजिटल इंडिया अ‍ॅक्ट आणण्याची तयारीदेखील केली जात आहे. त्यास अनेक कंगोरे आहेत. या 'एआय'चे नियमन करण्याचा देखील यात मुद्दा असेल. मात्र त्यासंदर्भात आताच काही सांगणे घाईचे ठरेल. कारण सार्वजनिक व्यासपीठावर 'एआय'संदर्भातील अधिनियमांची तरतूद उपलब्ध नाही. 'एआय'ने आपल्या आयुष्यात प्रवेश केला असून त्याच्या मदतीने स्वत:ला कुशल करतच पुढे जाऊ शकतो, असा विचार करायला हवा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news