पुणे : बूस्टर डोस घेणार्‍यांंची संख्या सहापट, तरीही महाराष्ट्र देशात अकरावा

पुणे : बूस्टर डोस घेणार्‍यांंची संख्या सहापट, तरीही महाराष्ट्र देशात अकरावा
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या तीन दिवसांमध्ये बूस्टर डोस घेणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोमवार ते गुरुवार या कालावधीत दररोज सरासरी 500 ते 800 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला होता. शुक्रवारी बूस्टर डोस घेणार्‍यांची संख्या 6000 पर्यंत वाढल्याचे कोव्हिन पोर्टलवरील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. तरीही, देशात बूस्टर डोस घेणार्‍यांच्या संख्येत महाराष्ट्र अकराव्या क्रमांकावर आहे. चीनसह जपान, ब्राझील, अमेरिका आदी देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यापासून भारतातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही महिने कोरोना पूर्णपणे आटोक्यात आला आहे.

त्यामुळे बूस्टर डोसला मिळणारा प्रतिसादही थंडावला होता. मात्र, जगभरात वाढत असणार्‍या कोरोनाच्या उद्रेकाने नागरिकांनी धास्ती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कोविन पोर्टलवरील आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील अंदाजे 6.71 कोटी लोकांनी अद्याप 18 वर्षे आणि त्यावरील प्रत्येकासाठी उपलब्ध असलेल्या कोविड लशीचा तिसरा किंवा बूस्टर डोस घेतलेला नाही. सध्या राज्य सरकारकडून कोव्हिशिल्ड लशीचा साठा होत नसल्याने सर्वच केंद्रांवर कोव्हॅक्सीनची लस उपलब्ध करून दिली जात आहे.

मात्र, नागरिक कोव्हिशिल्डबाबत विचारणा करीत असल्याचे चित्र आहे. राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, 'नवीन व्हेरियंटच्या संसर्गाबाबत वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. पात्र लाभार्थींनी बूस्टर डोस घेण्यास प्राधान्य दिल्यास संभाव्य संकट टाळता येऊ शकते. सध्या, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांमध्ये कोणतीही तीव्र वाढ झालेली नाही. मात्र, तरीही नागरिकांनी निष्काळजीपणाने वागू नये. सहव्याधी असलेले रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, तसेच सर्व पात्र लाभार्थींनी लसीकरण करून घ्यावे. कोरोना प्रतिबंधक वर्तनाच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा टाळावा.'

आपल्याकडे लाभार्थींची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसे डोस आहेत. गरज पडल्यास, आम्ही केंद्राकडून आणखी मागणी करणार आहोत. सर्व वयोगटांतील प्रथम, द्वितीय आणि बूस्टर डोससाठी पात्र असलेल्यांना लस मिळाली पाहिजे. राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली नसली, तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण ही गुरुकिल्ली आहे.
– डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य सेवा उपसंचालक

लसीकरणाची सद्यस्थिती
सार्वजनिक आरोग्य विभागाकडे 10 लाखांहून अधिक कोव्हॅक्सीन डोस उपलब्ध आहेत. त्याचा वापर पहिल्या, दुसर्‍या किंवा बूस्टर डोससाठी केला जाऊ शकतो.
गेल्या तीन दिवसांमध्ये अर्थात 22 डिसेंबरपासून शहरी भागातील लसीकरणात वाढ झाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक बूस्टर डोस
आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 4 कोटी 48 लाख 38 हजार 102 जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 1 कोटी 93 लाख 79 हजार 263 जणांनी आणि आंध्र प्रदेशमध्ये 1 कोटी 82 लाख 80 हजार 997 जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. महाराष्ट्र या यादीत अकराव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 94 लाख 51 हजार 706 जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. पहिला डोस घेणार्‍यांची संख्या 9 कोटी 16 लाख 42 हजार 837, तर दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या 7 कोटी 65 लाख 52 हजार 277 इतकी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news