जागतिक सिकल सेल दिन : सिकल सेल अ‍ॅनिमियाचे लवकर निदान हवे

जागतिक सिकल सेल दिन : सिकल सेल अ‍ॅनिमियाचे लवकर निदान हवे
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिकल सेल अ‍ॅनिमिया हा अनुवंशिक रक्तविकार आहे. या आजाराचे वेळीच निदान न झाल्यास मेंदू, डोळा, हृदय, गर्भाशय अशा अवयवांच्या कार्यात बिघाड होऊ शकतो. आजार लवकर ओळखता यावा, यासाठी वेळीच निदान आणि प्रबोधन आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सिकलसेल अ‍ॅनिमिया या आजारामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. सुमारे 1 कोटी 80 लाख लोकांमध्ये सिकलसेलची लक्षणे दिसून येतात आणि 14 लाख लोक सिकलसेलने ग्रस्त आहेत. सिकलसेल अ‍ॅनिमियामुळे लाल रक्तपेशी चंद्रकोरीच्या आकाराच्या बनतात. त्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा कमी पुरवठा होऊ शकतो. बरेचदा नवजात बालकांमध्ये सिकल सेल अ‍ॅनिमियासारखे रक्ताशी निगडीत आजार आढळून येतात.

जन्मजात व्यंगांचे लवकरात लवकर निदान व्हावे, यासाठी जिल्हा रुग्णालयातून बालकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले जातात. जन्माला आल्यापासून 24 ते 48 तासांच्या आत बालकांची रक्त तपासणी केली जाते. व्यंगांचे निदान झाल्यास उपचारांसाठी फॉलो अप घेतला जातो, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली.

भारतात 2047 पर्यंत निर्मूलनाचे लक्ष्य
भारतात 2047 पर्यंत सिकलसेल अ‍ॅनिमियाचे निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सिकलसेल अ‍ॅनिमिया 0 ते 40 वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतो. आदिवासी लोकांमध्ये याचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. आजार दूर व्हावा यासाठी तपासणी, निदान आणि उपचार यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 7 कोटी लोकांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. 2023 च्या अर्थसंकल्पातही याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.

नियंत्रण कार्यक्रमाची उद्दिष्टे

सिकलसेल आजाराविषयी जनजागृती करणे
सोल्युबिलिटी चाचणी, समुपदेशन आणि उपचारांसाठी वैद्यकीय अधिका-यांना प्रशिक्षण देणे.
सोल्युबिलिटी चाचणीमध्ये सकारात्मक आलेल्या व्यक्तींना इलेक्ट्राफोरेसीस चाचणी करण्यासाठी जवळच्या केंद्रांत पाठविणे.
सिकलसेल वाहक व्यक्तींना पिवळे कार्ड आणि सिकलसेलग्रस्त व्यक्तींना लाल कार्ड व निरोगी व्यक्तींना पांढरे कार्ड वाटप करणे.
ग्रस्त आणि वाहक व्यक्तींचे लसीकरण करणे.
गरजेनुसार फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, अँन्टिबायोटिक, पेनकिलर अशी औषधे प्राथमिक आरोग्य, ग्रामीण उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देणे.
विशेषज्ज्ञांची आवश्यकता असल्यास टेलिमेडीसन सुविधेचा वापर करणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news