Shubman Gill Century : हरारेमध्ये आले ‘गिल’ नावाचे वादळ, फटकावले पहिले वनडे शतक!

Shubman Gill Century : हरारेमध्ये आले ‘गिल’ नावाचे वादळ, फटकावले पहिले वनडे शतक!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shubman Gill Century : भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले आहे. टीम इंडिया (IND vs ZIM) झिम्बाब्वे विरुद्ध वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळत आहे. केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील पहिल्या सामन्यात डावाची सुरुवात करणारा गिल तिस-या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि शतकी खेळी साकारली.

82 चेंडूत शतक..

भारतीय संघाचे सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुल धावा काढण्यासाठी झगडताना दिसले. मात्र शुभमन गिलने मैदानात उतरताच फटकेबाजीच्या जोरावर झटपट धावा केल्या. त्याने 82 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. गिल क्रिजवर आला तेव्हा भारताची धावसंख्या 15 षटकांत 63 धावा होती. त्यानंतर लगेचच संघाची दुसरी विकेटही पडली. त्याने इशान किशनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 127 चेंडूत 140 धावांची भागीदारी केली. (Shubman Gill Century)

याआधी शुबमनने मालिकेतील पहिल्या सामन्यात नाबाद 82 धावांची खेळी करत शिखर धव सोबत संघाला 10 गडी राखून मोठा विजय मिळवून दिला होता. भारतीय संघ मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. शेवटचा सामना जिंकून क्लीन स्वीप द्यायचा इरादा भारतीय संघाने पक्का केला आहे. या मालिकेत आतापर्यंत झिम्बाब्वेचा संघ एकाही सामन्यात 200 धावांचा टप्पा गाठू शकलेला नाही. (Shubman Gill Century)

शुबमनचे वेस्ट इंडिजमध्ये पावसामुळे शतक हुकले होते

वेस्ट इंडिज दौऱ्यावरच शुभमन गिलला शतक झळकावण्याची संधी होती. पाऊस पडत असताना तो 98 धावांवर खेळत होता. पाऊस थांबल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी आली नाही आणि तो शतक झळकावण्यापासून वंचित राहिला. 22 वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिलने वनडे कारकिर्दीत शानदार पदार्पण केले आहे. तो केवळ 9 वा सामना खेळत आहे. एक शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. आता सर्वात मोठा डाव खेळला गेला आहे. सरासरी 70 पेक्षा जास्त आहे. यापूर्वी नाबाद 98 ही सर्वात मोठी खेळी होती. तो 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये त्याने प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सर्वात मोठी 268 धावांची खेळी खेळली. आता 2022 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

2022 मध्ये शुबमनची बॅट तळपत आहे

यंदा शुभमन गिलची बॅट जोरदार तळपत आहे. त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 64, 43 आणि 98* धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 82 धावांची खेळी केली होती. तर दुस-या सामन्यात 33 धावा केल्या आणि आता तिसऱ्या सामन्यात त्याने शतक झळकावले. गिलने 2022 पूर्वी खेळलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 धावा केल्या होत्या. 2018 अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असलेला गिल त्या स्पर्धेत प्लेयर ऑफ द सीरीज ठरला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news